नागपूर : पूर्व विदर्भातील सहाही जिल्हे मिळून २७ जून रोजी १०४ रुग्ण व दोन मृत्यूची नोंद होती. मागील १० दिवसांत रुग्णसंख्येत निम्म्याने घट होऊन मंगळवारी ५६ झाली आहे. मात्र, या दिवसांत नागपुरात २६८ रुग्णांची नोंद झाली असताना गडचिरोली जिल्ह्यात त्याहून अधिक २७२ रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे या जिल्ह्याची चिंता वाढली आहे.
पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, चंद्रपूर, वर्धा व गडचिरोली या सहा जिल्ह्यात कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या ७ लाख ५० हजार ८२६ झाली आहे. तर, १४ हजार २७७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक, ४ लाख ७७ हजार २३० रुग्ण व ९ हजार ३१ मृत्यू एकट्या नागपूर जिल्ह्यात झाले आहेत. याशिवाय, भंडारा जिल्ह्यात ५९ हजार ४८७ रुग्ण व १ हजार १२९ मृत्यू, चंद्रपूर जिल्ह्यात ८४ हजार ७५० रुग्ण व १ हजार ५३२ मृत्यू, गोंदिया जिल्ह्यात ४० हजार ९१३ रुग्ण व सर्वात कमी ५७५ मृत्यू, वर्धा जिल्ह्यात ५८ हजार ८३ रुग्ण व १ हजार ३५५ मृत्यू, गडचिरोली जिल्ह्यात सर्वात कमी ३० हजार ३६३ रुग्ण व ६५५ मृत्यू झाले आहेत. मंगळवारी नागपुरात २१, भंडाऱ्यात शून्य, चंद्रपूरमध्ये ११, गोंदियात एक, वर्धेत तीन तर गडचिरोली जिल्ह्यात २० रुग्णांची नोंद झाली आहे. तज्ज्ञांच्या मते, गडचिरोली जिल्ह्यात पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांमध्ये जिल्ह्याबाहेरील रुग्णांची संख्या मोठी आहे. यामुळे इतर जिल्ह्यातून येणाऱ्या रुग्णांची चाचणी करूनच जिल्ह्यात प्रवेश दिल्यास स्थिती नियंत्रणात येण्याची शक्यता आहे.
-दहा दिवसांतील रुग्णांची स्थिती
नागपूर : गडचिरोली
२२ : ५३
२४ : २०
१९ : ५८
२५ : २०
३४ : १६
४८ : १६
४२ : ७
१९ : ४०
१४ : २२
२१ : २०