नागपूर : कोरोना प्रतिबंधक लसीकरणात पहिल्या डोजच्या तुलनेत, दुसऱ्या डोजला अधिक प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे. नागपूर जिल्ह्यात आज १३२४ लाभार्थ्यांनी पहिला डोज घेतला तर १४३४ लाभार्थ्यांनी दुसरा डोज घेतला. एकूण २७५८ लाभार्थ्यांचे लसीकरण झाल्याने याचे प्रमाण ७९ टक्के झाले. शहराच्या तुलनेत ग्रामीणमध्ये दुसरा डोज घेणाऱ्या लाभार्थ्यांचे प्रमाण मोठे आहे.
शहरात आज २० केंद्रावर प्रत्येकी १०० प्रमाणे २००० लसीकरणाचे लक्ष्य देण्यात आले होते. त्यापैकी १८३६ लाभार्थ्यांनी लस घेतली. यात ५९७ आरोग्य कर्मचाऱ्यांनी व ३५२ फ्रंट लाईन कर्मचारी मिळून ९४९ लाभार्थ्यांनी कोरोनाचा पहिला डोज घेतला. तर ८८७ लाभार्थ्यांनी दुसरा डोज घेतला. शासकीय केंद्राच्या तुलनेत काही खासगी केंद्रावर लसीकरणाची टक्केवारी १०० टक्क्यांवर गेली आहे.
नागपूर ग्रामीणमध्ये आज १५ केंद्रावर प्रत्येकी १००प्रमाणे १५००लसीकरणाचे लक्ष्य देण्यात आले होते. त्यापैकी ९२२ लाभार्थ्यांचे लसीकरण झाले. यात आरोग्य कर्मचारी व फ्रंट लाईन कर्मचारी मिळून ३७५ लाभार्थ्यांनी पहिला डोज घेतला. तर, ५४७ लाभार्थ्यांनी दुसरा डोज घेतला. सर्वाधिक लसीकरण हिंगणा केंद्रावर झाले. येथे १२३ टक्के लाभार्थ्यांना लस देण्यात आली.