नागपूर: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या भूगर्भशास्त्र विभागात आधुनिक तंत्रज्ञानयुक्त लॅब सज्ज झाली आहे. मॉड्युलर ऑप्टिकल लॅबमध्ये ३ हजारांपेक्षा अधिक मिनरल्स, रॉक्स, फॉसिल्स आदी नमुन्यांचा संग्रह करण्यात आला आहे. भूगर्भशास्त्र विभागात अशाप्रकारे आधुनिक प्रयोगशाळा असलेले नागपूर विद्यापीठ हे महाराष्ट्रातील एकमेव विद्यापीठ ठरले आहे.
आधुनिक तंत्रज्ञानयुक्त लॅबचा शुभारंभ प्रजासत्ताक दिनी कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी कुलसचिव डॉ. राजू हिवसे, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. प्रशांत माहेश्वरी, डॉ. प्रशांत कडू, विभाग प्रमुख डॉ. कीर्तीकुमार रणदिवे, ज्ञानस्त्रोत केंद्र संचालक डॉ. विजय खंडाळ प्रामुख्याने उपस्थित होते. येथील मेट्यामाॅर्फिक पेट्रोलॉजी लॅब, इग्निअस पेट्रोलॉजी लॅब, मिनरलॉजी लॅब, सेडीमेंट्री पेट्रोलाॅजी लॅब, ओअर जिओलॉजी लॅबही महत्त्वाची आहे. विविध प्रकारचे मिनरल्स आणि दगडांचे छोटे नमुने तयार करीत त्याच्या तपासणीसाठी ही अत्याधुनिक प्रयोगशाळा आहे. सोबतच विभागात नव्याने तयार करण्यात आलेल्या एल. जी. ग्वालानी स्मृती सभागृहाचे लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी विभागातील अधिसभा सदस्य याकूब शेख, विशेष कार्य अधिकारी प्रदीप बिनीवाले, उपकुलसचिव डॉ. रमण मदणे, डॉ. अनिल पोफरे, डॉ. सुमेध हुमणे, डॉ. वंदना सामंत, मारुती बोरकर, राजेश लांडगे, सुचित्रा मेंढे, साईली ढोक, अर्चना राठोड, योगेश मुरकुटे अभय वर्हाडे, हेमंत खंडारे, मनीष देशमुख, भुजंग मांजरे, समया हुमणे, कृतिका जांगडे, प्रतीक गोडबोले, कौस्तुभ देशपांडे उपस्थित हाेते.
संशोधनास मदतभूगर्भशास्त्र विभागातील या अत्याधुनिक प्रयोगशाळेचा मेट्रोलॉजी, मायनिंग तसेच भूगर्भशास्त्र या शास्त्रांमध्ये संशोधन करण्यास मोठी मदत होणार आहे. अत्याधुनिक प्रयोगशाळेचा उपयोग सिमेंट उद्योग, स्टील उद्योग यासह विविध प्रकारच्या चाचण्यांसाठी होणार आहे. विद्यार्थ्यांना या विषयाचा अभ्यास करताना अधिकाधिक माहिती या प्रयोगशाळेतून प्राप्त होणार आहे. शिवाय या प्रयोगशाळेमध्ये लावण्यात आलेले मायक्रोस्कोप हे जर्मनी येथून आणण्यात आले आहे. या मायक्रोस्कोपच्या मदतीने मोठ्या स्क्रीनच्या आधारे विद्यार्थ्यांना अधिक सूक्ष्म बाबींचा अभ्यास करता येणार आहे.