गोपालकृष्ण मांडवकर।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘दिवाळीच्या सणात हातात पैसा यावा म्हणून आठ दिवस फुलांचा तोडाच केला नाही. दोन दिवसांआधी फुले तोडून बाजाराला नेणार होतो. पण नेमका तेव्हाच पाऊस आला. लदबदलेले झाड मातीत पडले. चिखलाने फुले भरली. ज्या फुलांचा पैसा होणार होता, त्या फुलांचा शेतात चिखल झाला. आता दोष तरी कुणाला देणाऐन सणाच्या दिवशी नगदी उत्पन्न देणाऱ्या या फुलांनीच यंदा मात्र शेतकऱ्यांना दगा दिला. शेतकऱ्याचा वाली कुणीच नाही बघा’ अशी हृदय पिळवटणारी प्रतिक्रिया आहे सावनेर तालुक्यातील वाकी या गावच्या लक्ष्मीकांत कोढे या शेतकऱ्याची !यंदा ऐन दिवाळीत जिल्ह्यात पाऊस झाला. दिवाळीच्या सणाला झेंडूच्या फुलांची मागणी असल्याने अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात ही लागवड केली. ऐन सणाच्या दिवशी नगदी उत्पन्न देणाऱ्या या फुलांनीच यंदा मात्र शेतकऱ्यांना दगा दिला. ऐन दिवाळीत निसर्ग कोपला. फुलांचा पैसा करण्याचे स्वप्न वास्तवात न उतरता डोळ्यातच राहिले अन् आसवांच्या रूपाने अनेकांच्या गालावर ओघळले.नागपूर जिल्ह्यात सुमारे १७०० शेतकरी झेंडूच्या फुलांचे उत्पादन घेतात. आपल्या शेतापैकी अर्धा एकर ते दोन एकरात या फुलांची लागवड करतात. अडीच महिन्यात ही झाडे फुलावर येतात. दसऱ्यापासून उत्पादन सुरू होते. पुढे दोन महिने झाडावर फुले येत राहतात. दिवाळीत भाव चांगला येत असल्याने आणि मागणीही अधिक असल्याने शेतकरी साधारणत: दिवाळीच्या आठ दिवसांआधी तोडा थांबवितात.लक्ष्मीपूजनाच्या तोंडावर तोडा करून माल स्वत:च बाजारात आणतात आणि चिल्लर विक्री करतात. त्यातून नगदी पैसा येत असल्याने शेतकरी कुटूंबांची दिवाळी आनंदाने साजरी होते.यंदा मात्र दगा झाला. एन तोडा करण्याच्या वेळी पाऊस आल्याने झाडे शेताततच पडली. त्यामुळे माल वाया गेला. ज्यांनी तोडा करून आणला होता, त्यांचा माल पावसात सापडल्याने काळा पडला आणि सडला. यामुळे शेतकऱ्यांचा स्वप्नभंग झाला. सडलेला माल तसाच टाकून शेतकरी उदास मनाने गावाकडे परतले. परिणामत: नागपूरच्या बाजारपेठेत दुसऱ्या दिवशी सडलेल्या फुलांचे ढिग जमा झालेले दिसले.या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांशी संवाद साधला असता अनेकांनी ही सल बोलून दाखविली. नागपूर तालुक्यातील वारंगा येथील राहूल थूल म्हणाले, बाजारात दोन क्विंटल माल आणला होता. अर्धा माल फेकण्यात गेला. ३० ते ४० रुपये किलो भाव आला. वारंगा वाकेश्वर येथील प्रशांत खोंडे म्हणाले, दिवाळीमुळे आठ दिवसांआधी तोडा थांबविला होता. नेमका तो पावसात सापडला.ओला माल विकण्यात न आल्याने ५० ते ६० हजारांचे नुकसान झाले. ऐन कमाईच्या दिवसात फटका बसला.सावनेर तालुक्यातील वाकी येथील लक्ष्मीकांत कोढे यांचा चार क्विंटल माल शेतातच सडला. फुले निवडून ८०० रुपये भाडे देऊन मेटॅडोरने विक्रीला आणली होती. पण पैसा आला नाही. जामघाटचे विनोद रणनवरे मात्र नशिबवान ठरले. पावसाआधीच नऊ क्विंटल फुलांचा तोडा करून त्यांनी विक्रीला आणल्याने ते नुकसानीतून बचावले.
मातीमोल भावनागपूरच्या बाजारपेठेत दिवाळीच्या तीन दिवसात दररोज सरासरी १४ ते १८ क्विंटल झेंडूची फुले विक्रीला आली होती. त्यातील सरासरी २० ते ३० टक्के फुले सडल्याने आणि काळी पडल्याने वाया गेली. अनेकांना शेतातील फुलांचा तोडा करण्याची संधीच मिळाली नाही. पावसात फुलझाडे मोडून चिखलात पडल्याने शेतातील शंभर टक्के माल वाया गेला. असा सरासरी ५० टन माल शेताततच सडला. यंदा हलक्या सुक्या मालाला ४० ते ८० रुपये प्रतिकिलो भाव आला. तर ओल्या मालाला २० ते ३० रुपये प्रति किलो असा भाव आला.
यंदा शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. फुले मातीमोल झाली. असे नुकसान टळावे यासाठी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर खरेदीची सेवा मिळावी, अशी आपण सरकारकडे मागणी करणार आहोत.- जयंत रणनवरे, अध्यक्ष,महात्मा फुले पुष्प उत्पादक असोसिएशननुकसान भरपाईची सोयच नाहीबहुतेक शेतकऱ्यांच्या सात-बारावर फुलझाडांची नोंद नसल्याने नुकसान भरपाईची सोयच राहिलेली नाही. सात-बारावर नोंद घेण्याचे कष्ट ना तलाठ्याने घेतले; ना शेतकऱ्यांनाही सुचले. त्यामुळे आता नुकसान झाल्यावर केवळ नशिबाला दोष देण्याशिवाय गत्यंतर राहिलेले नाही.