नागपूर : कोरोनाची साथ ओसरली असताना म्युकरमायकोसिसचे नवीन संकट ओढावले आहे. नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत ९६० रुग्णांची नोंद झाली असून ७७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. धक्कदायक म्हणजे, कोरोनाचा मृत्यूदर १.८७ टक्के असताना म्युकरमायकोसिसचा दर ७.९४ टक्क्यांवर पोहचला आहे. रुग्ण बरे होण्याचा दर ४८.८१ टक्के आहे. लक्षणे दिसताच उपचार घेतल्यास हा आजार बरा होत असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.
म्युकरमायकोसिसच्या वाढत्या धोक्याविषयी आरोग्य विभागाने गंभीर इशारा दिला आहे. तज्ज्ञाच्या मते, रक्तातील साखरेचे योग्य व्यवस्थापन आणि काळजी घेतल्यास म्युकरमायकोसिसच्या धोक्याला दूर ठेवता येऊ शकते. म्युकरमायकोसिस हा संसर्गजन्य आजार नाही. त्यामुळे घाबरू जाऊ नये. हा रोग वातावरणातून शरीरात येतो. मधुमेह असलेल्या किंवा कोरोनाच्या उपचारादरम्यान मधुमेह झाला, अशांना म्युकरमायकोसिस होण्याचा अधिक धोका असतो. आरोग्य विभागाने उपलब्ध करून दिलेल्या माहितीनुसार, नागपूर जिल्ह्यात शुक्रवारी २७ नव्या रुग्णांची भर पडली. रुग्णांची एकूण संख्या ९६९ झाली असून, ४३९ रुग्ण उपचार घेत आहेत. शासकीय रुग्णालयात आतापर्यंत १९ तर खासगी रुग्णालयांमध्ये ५८ असे एकूण ७७ रुग्णांचे जीव गेले आहेत. मृत्यूचा हा दर कोरोनापेक्षा अधिक असल्याचे दिसून येत आहे.
-७५० रुग्णांवर शस्त्रक्रिया
म्युकरमायकोसिस म्हणजे ‘काळी बुरशी’चा आजार वेगाने पसरत असल्याने आजाराचे निदान झाल्यास तातडीने शस्त्रक्रियेवर भर देऊन रुग्णाला औषधोपचाराखाली आणले जाते. आतापर्यंत ७५० रुग्णांवर शस्त्रक्रिया झाल्या असून, ४७३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
-म्युकरमायकोसिस हा संसर्गजन्य आजार नाही
म्युकरमायकोसिस हा संसर्गजन्य आजार नाही. त्यामुळे घाबरू जाऊ नये. या आजाराचा संसर्ग झाल्यास नाक बंद होते. तो सायनसमध्ये जास्त पसरल्यास डोळ्याने अंधुक दिसू लागते आणि नंतर याचा संसर्ग मेंदूमध्ये झाल्यास फिट्स येतात. काळ्या बुरशीला आवर घालण्यासाठी रुग्णालयांनी रोज रुग्णाची रक्तशर्करा चाचणी करावी. रुग्णालयातून सुटी झाल्यावरही आहाराचे काही नियम पाळणे रुग्णाला गरजेचे आहेत. मातीकाम करणाऱ्या शेतकऱ्यांना या बुरशीचा धोका जास्त आहे.
-डॉ. प्रशांत निखाडे, अध्यक्ष, टास्क फोर्स म्युकरमायकोसिस
एकूण रुग्ण : ९६९
एकूण मृत्यू : ७७
एकूण रुग्ण बरे : ४७३
सध्या भरती रुग्ण :४३९