लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आपल्या मुलांच्या सुखासाठी एक पिता अनेक अडचणी, त्रास सहन करून कोणताही त्याग करायला तयार असतो. मौदा तालुक्यातील चिरव्हा येथील रहिवासी अनिल डुंभरे हा पिता याच संघर्षाचे जिवंत उदाहरण आहे. बिटा थॅलेसेमिया या आजाराने ग्रस्त आपल्या मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात मदतीसाठी दारोदार भटकणाऱ्या या पित्याने दररोजच्या उपचाराच्या खर्चासाठी परिश्रमाने उभे केलेले घरही गहाण टाकले आहे. मात्र उपचाराचा खर्चच इतका अवाढव्य आहे की त्यांचा हा टोकाचा प्रयत्नही अपुरा पडत आहे.शेतीची कामे, रोजमजुरी, सेंट्रींग, प्लॅस्टर असे मिळेल ते काम करून कुटुंबाचा गाडा हाकणाऱ्या अनिल डुंभरे यांच्यावर हा अगतिक प्रसंग ओढवला आहे. त्यांचा दोन वर्षांचा मुलगा रिहानला बिटा थॅलेसेमिया मेजर या धोकादायक आजाराने विळखा घातला आहे. मुलाच्या जन्माने या गरीब कुटुंबात निर्माण झालेला आनंद क्षणात मावळला. पाचव्या महिन्याचा असताना आजाराचे निदान लागले. उपचारासाठी डॉक्टरांनी सांगितलेल्या अवाढव्य खर्चाने तर डुंभरे कुटुंबाचे हास्यच हिरावून घेतले. तरीही लेकराच्या मायेने वडील मदतीसाठी धावाधाव करीत आहेत. गेल्या दोन वर्षांपासून त्यांची सतत धडपड सुरू आहे. रिहानला दर आठवड्याला रक्त द्यावे लागते. शिवाय अनेक चाचण्या कराव्या लागतात. अनिल यांनी शक्य होईल तसा उपचार चालविला आहे. स्वत:जवळची जमा व काही संवेदनशील नागरिकांच्या मदतीने त्यांनी सहा-सात लाख रुपये खर्च करून उपचार सुरू ठेवला आहे.३० लाखांचा खर्चया आजारावर ‘बोनमॅरो ट्रान्सप्लान्ट’ उपचार पद्धती आहे. नुकतीच रिहान आणि अनिल यांच्या बोनमॅरोची बंगळुरू येथे चाचणी करण्यात आली व यामध्ये दोघांचे बोनमॅरो १०० टक्के जुळले. मात्र प्रत्यक्ष ऑपरेशन व त्यानंतर येणाऱ्या खर्चासाठी ३० लाख रुपये लागत आहेत. त्यांनी स्वत:ची गाडी विकली व वडिलोपार्जित घरही गहाण टाकले आहे. उद्या रस्त्यावर येण्याची वेळ येईल, ही जाणीव असूनही त्यांनी मुलाच्या प्रेमापोटी हा टोकाचा निर्णय घेतला आहे. मात्र हे प्रयत्नही अपुरे पडत आहेत. बोनमॅरो ट्रान्सप्लान्ट झाले तर रिहान जगू शकेल, या एवढ्या आशेने त्यांची धडपड चालली आहे. त्यामुळे सेवाभावी संस्था, संवेदनशील नागरिक व दानदात्यांनी आर्थिक मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.रिहान अनिल डुंभरे याला आर्थिक मदतीच्या हाताची गरज आहे. हीच मदत त्याला जगण्याची उभारी देऊ शकते. मदत करू इच्छिणाऱ्यांनी अनिल नरहरी डुंभरे यांच्या बँक ऑफ इंडियाच्या खाते क्रमांक ८७६४१०११००१७३९३ यावर मदत जमा करावी. बँकेचा आयएफसी कोड बीकेआयडी ०००८७६४ हा आहे. अधिक माहितीसाठी अनिल यांच्या ८३९०८९७५८२ या क्रमांकावर संपर्क साधावा.
मुलाला वाचविण्यासाठी घर ठेवले गहाण : अगतिक पित्याची धडपड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 11:15 PM
आपल्या मुलांच्या सुखासाठी एक पिता अनेक अडचणी, त्रास सहन करून कोणताही त्याग करायला तयार असतो. मौदा तालुक्यातील चिरव्हा येथील रहिवासी अनिल डुंभरे हा पिता याच संघर्षाचे जिवंत उदाहरण आहे. बिटा थॅलेसेमिया या आजाराने ग्रस्त आपल्या मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात मदतीसाठी दारोदार भटकणाऱ्या या पित्याने दररोजच्या उपचाराच्या खर्चासाठी परिश्रमाने उभे केलेले घरही गहाण टाकले आहे. मात्र उपचाराचा खर्चच इतका अवाढव्य आहे की त्यांचा हा टोकाचा प्रयत्नही अपुरा पडत आहे.
ठळक मुद्देलोकमत मदतीचा हात : बिटा थॅलेसेमियाग्रस्त रिहानच्या उपचारासाठी हवी मदत