लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे (मेयो) शवविच्छेदनगृह अनुचित घटनांना घेऊन नेहमीच चर्चेत राहिले आहे. न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. मकरंद व्यवहारे यांच्याकडे या विभागाची जबाबदारी येताच त्यांनी काही सुधारणा घडवून आणल्या. त्यांच्या पुढाकारामुळे आता या विभागाचा कायापालट होणार असून, शासनाने नव्या शवचिकित्सागृहाच्या इमारतीसाठी चार कोटी ९७ लाख ८३ हजार रुपयांच्या खर्चाला मंजुरी दिली आहे. नव्या शवचिकित्सागृहामुळे मेयो प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.मेयोच्या न्यायवैद्यकशास्त्र विभागाच्या शवविच्छेदनगृहात सोयींच्या नावाची बोंब होती. नावाला केवळ छत म्हणजे लोखंडी फ्रेम व सिमेंटचे टेबल होते. तब्बल २२ वर्षांपासून शवविच्छेदन उघड्यावर व्हायचे. या विभागाचे विभागप्रमुख म्हणून डॉ. व्यवहारे यांची नियुक्ती होताच त्यांनी सर्वप्रथम शवविच्छेदनगृहाच्या डागडुजीची काम हाती घेतले. यासाठी महाविद्यालयाकडून निधीची मागणी न करता सार्वजनिक बांधकाम विभागाला विनंती करून जर्जर झालेल्या शवविच्छेदनगृहाची दुरुस्ती करून घेतली. गृहाचा आकार वाढवून उघड्यावरील शवविच्छेदन बंद केले. पूर्वी या गृहात पुरेशी प्रकाशव्यवस्था, मुबलक पाणीपुरवठा व पाण्याचा निचरा होत नसल्याची मोठी समस्या होती. आता पाण्याच्या सोयीसह तीन नवीन ‘आॅटोप्सी’ टेबलची व्यवस्था करण्यात आली. ४० वर्षे जुनी विद्युत पुरवठा यंत्रणा बदलण्यात आली. कर्मचाऱ्यांसाठी प्रथमच स्वच्छतागृहाची सोय झाली. मे २०१६ पासून विभागातील तीनही शीतगृहे पूर्णत: कार्यरत नव्हती. ‘आॅटोप्सी’ टेबलची सोय नव्हती. ही सोयही त्यांनी उपलब्ध करून दिली. मात्र, ‘मेडिकल कौन्सिल आॅफ इंडिया’च्या निकषाप्रमाणे विभागाची इमारत नसल्याने अडचणी येत होत्या. डॉ. व्यवहारे यांनी नव्या शवचिकित्सागृहाच्या इमारतीचा प्रस्ताव तयार केला. या प्रस्तावाला गेल्याच आठवड्यात मंजुरी मिळाली. इमारतीच्या बांधकामासाठी ४ कोटी ९७ लाख ८३ हजार रुपयांची तरतूदही करण्यात आली. प्रस्तावित शवचिकित्सागृहाच्या इमारतीमुळे अनेक समस्या कायम निकाली निघण्याची शक्यता आहे.
नागपुरात पाच कोटीतून उभे राहणार शवचिकित्सागृह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 12:49 AM
शासनाने नव्या शवचिकित्सागृहाच्या इमारतीसाठी चार कोटी ९७ लाख ८३ हजार रुपयांच्या खर्चाला मंजुरी दिली आहे. नव्या शवचिकित्सागृहामुळे मेयो प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.
ठळक मुद्देमेयोच्या पुढाकाराला यश : शासनाची मिळाली मंजुरी