नागपूर : ग्रामविकास विभागाने माजी गृहमंत्री यांच्या नावावर 'आर.आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार योजना' सुरू केली. त्यात कामठी तालुक्यातील कढोली गावाने ‘जिल्हा सुंदर ग्रामपंचायती’चा पुरस्कार पटकावला. जि.प. अध्यक्ष रश्मी बर्वे यांच्या हस्ते हा पुरस्कार वितरित करण्यात आला.
आर. आर. (आबा) पाटील यांच्या पुण्यातिथीनिमित्त जि.प.च्या पंचायत विभागातर्फे सन २०१९-२० या वर्षीच्या तालुका व जिल्हा सुंदर गाव ग्रामपंचायत पुरस्काराचे वितरण जिल्हा परिषदेच्या कै.आबासाहेब खेडकर सभागृह येथे पार पडले. अध्यक्षस्थानी जि.प. अध्यक्ष रश्मी बर्वे होत्या. तर उपाध्यक्ष मनोहर कुंभारे, शिक्षण व अर्थ समितीच्या सभापती भारती पाटील, समाजकल्याण समितीच्या सभापती नेमावली माटे, पारशिवनीच्या सभापती मिना कावळे, नरखेडच्या सभापती नीलिमा रेवतकर, कळमेश्वरचे सभापती श्रावण भिंगारे, रामटेकच्या सभापती ठाकरे, जि.प. सदस्य शांता कुमरे, प्रकाश खापरे, समिर उमप तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विवेक ईलमे आणि पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल किटे उपस्थित होते. तालुका सुंदर ग्रामपंचायतींचा पुरस्कार तालुकास्तरावर घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये सर्वाधिक गुण प्राप्त केलेल्या ग्रामपंचायतींना प्रमाणपत्र देण्यात आले. संचालन दिनेश मासोदकर यांनी तर प्रदीप गायगोले यांनी आभार मानले.
बॉक्स
सुंदर तालुका गाव ग्रामपंचायत पुरस्कार प्राप्त गावे
तालुका -गाव
नागपूर- फेटरी
कामठी -कढोली
हिंगणा -सुकळी (गु.)
काटोल- खुर्सापार
कळमेश्वर- उबाळी
- सावनेर- खैरी (ढा.)
नरखेड - खापा (घु.)
पारशिवनी- पालोरा
मौदा -गोवरी
रामटेक- बांद्रा
उमपरेड -चांपा
भिवापूर -गोंडबोरी
कुही- देवळी (खुर्द)
बॉक्स
माजी मुख्यमंत्र्यांच्या आदर्श गावाला पुरस्कार
आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार योजनेत तालुक्यातून अव्वल ठरलेल्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दत्तक ग्राम फेटरीने पुरस्कार पटकाविला. २०१४ मध्ये मुख्यमंत्रीपदी विराजमान होताच देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या आधीच्या पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या फेटरीला आमदार आदर्श ग्राम योजनेंतर्गत दत्तक घेतले होते, हे विशेष.
-------------