वसीम कुरैशी
नागपूर : वर्ष २०२० पूर्वी लॉकडाऊननंतर अनलॉक सुरू झाल्यापासून आतापर्यंत ११ महिन्यांत पहिल्यांदा शनिवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सर्वाधिक विमानांचे उड्डाण रद्द झाले. या दिवशी १६ विमाने रद्द झाली, तर १३ विमाने रवाना झाली. या विमानांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी प्रवासी होते.
रद्द झालेल्या विमानांमध्ये इंडिगो एअरलाइन्सचे ६ ई ९६३ गोवा-नागपूर, ९०९ बंगळुरू-नागपूर, ८१२ कोलकाता-नागपूर, ६३३५ पुणे-नागपूर, ६०१५ इंदूर-नागपूर, ६७४६ पुणे-नागपूर, ७१३७ हैदराबाद-नागपूर, ५६२४ मुंबई-नागपूर, ६८०३ बंगळुरू-नागपूर, ६०७२ चेन्नई-नागपूर, ४८६ बंगळुरू-नागपूर, ६७२४ पुणे-नागपूर आणि ७१६१ अहमदाबाद-नागपूर या उड्डाणांचा समावेश आहे. याशिवाय गो-एअरचे जी८-८८१ पुणे-नागपूर, जी८-१४१ मुंबई-नागपूर विमान रद्द झाले. याव्यतिरिक्त पुणे येथून येणारे आणि नागपुरात नाइट हॉल्ट करणारे विमान ६३३६ सुद्धा रद्द झाले.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार २५ मे २०२० पासून आतापर्यंत नागपूर विमानतळावर विमानांचे उड्डाण रद्द होण्याचा सर्वाधिक आकडा १६ एवढा होता. लॉकडाऊनपूर्वी नागपुरातून दररोज जवळपास ३२ विमानांची उड्डाणे व्हायची. दोन महिन्यांपासून विमानांच्या उड्डाणांमध्ये हळूहळू वाढ होत होती आणि उड्डाणांची संख्या २२ ते २५ वर पोहोचली होती; पण सरसकट १६ विमानांची उड्डाणे रद्द होणे, ही बाब विमानतळासाठी संकटाची आहे.
ड्यूटी सेल पाडला
वाढत्या कोरोना संक्रमणाने विमान प्रवासाची विचारपूस वाढली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नागपूर विमानतळावर एमआयएल टर्मिनल प्रमुखाच्या काऊंटरवर ठेवलेला ड्यूटी सेल कुणीतरी जमिनीवर पाडला. त्यामुळे या मोबाइल फोनची स्क्रीन तुटली. त्यामुळे लँडलाइन कॉलवर कोणताही प्रतिसाद मिळत नाही, तर दुसरीकडे नागपुरातून सर्वाधिक उड्डाणांचे संचालन करणाऱ्या विमान कंपन्यांचे कर्मचारी त्रस्त झाले आहेत. विमानतळावर विमान कंपनीच्या एका ग्राऊंड स्टाफला अत्यंत गंभीर स्थितीत दोन दिवसांपूर्वी अभिनेते सोनू सूद यांच्या मदतीने एअरलिफ्ट केले होते. तिची प्रकृती गंभीर झाल्यानंतर येथील कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.