लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अनियंत्रित रक्तदाब व मधुमेहामुळे मूत्रपिंड निकामी होण्याचा सर्वाधिक धोका असतो. परंतु हे दोन आजार नसतानाही दक्षिण-पश्चिम विदर्भातील खारपाणपट्ट्यात मूत्रपिंड निकामी रुग्ण, विशेषत: सातपुड्याच्या डोंगरदऱ्याच्या पायथ्याशी असलेल्या छोट्या-छोट्या गावांमध्ये सर्वाधिक दिसून येत आहेत. येथील पाण्याच्या तपासणीसाठी ‘नीरी’ची मदत घेतली जात आहे. आतापर्यंत ६० रुग्ण या आजाराचे आढळून आले आहे. लवकरच या संदर्भातील अहवाल सादर केला जाईल, अशी माहिती, वरिष्ठ नेफ्रोलॉजिस्ट डॉ. धनंजय ऊकळकर यांनी येथे दिली.मूत्रपिंड (किडनी) विशेषज्ञ डॉक्टरांची संस्था ‘दि नेफ्रोलॉजी सोसायटी’चा वार्षिक सोहळा रविवार १५ मार्च रोजी रामदासपेठ येथील खासगी हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आला आहे. याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. पत्रपरिषदेला ‘दि नेफ्रोलॉजी सोसायटी’चे अध्यक्ष डॉ. अश्विनीकुमार खांडेकर, सचिव डॉ. निशांत देशपांडे, डॉ. शिवनारायण आचार्य, डॉ. सुनीती खांडेकर व डॉ. विशाल रामटेके उपस्थित होते.डॉ. देशपांडे म्हणाले, दरवर्षी जागतिक मूत्रपिंड दिनी, संस्थेच्या वार्षिक सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. यावर्षी पीजीआय-चंदीगढ येथील नेफ्रोलॉजीच्या डॉ. ऋतंभरा नाडा, एसजीपीजीआय-लखनौ येथील रिनल न्युट्रिशनच्या डॉ. अनिता सक्सेना विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहतील. कार्यशाळेच्या पहिला दिवस म्हणजे १४ मार्चला पॅथॉलॉजी सोसायटीच्या सहकार्याने ‘केस डिस्कशन’ आयोजित केले आहे. नेफ्रो पॅथोेलॉजिस्ट डॉ. राजन दुग्गल मार्गदर्शन करतील. ‘कॉम्प्लिमेन्ट ग्लोमेरुलोपॅथी’ या विषयावर डॉ. ऋतुंभरा नाडा, पद्मश्री डॉ. बी.एस. चौबे ओरेशन सादर करतील.मधुमेहामुळे ४० टक्के मूत्रपिंड निकामीडॉ. देशपांडे व डॉ. उखळकर म्हणाले, मधुमेहामुळे ४० ते ५० टक्के मूत्रपिंड निकामी होतात. या शिवाय, ‘क्रोनिक किडनी डिसीज’मुळे (सीकेडी) २० टक्के, उच्च रक्तदाबामुळे १२ ते १४ टक्के तर ‘पेन किलर्स’ व स्वत:हून औषधे घेतल्याने पाच ते १० टक्के मूत्रपिंड निकामी होण्याची शक्यता असते.देशात मूत्रपिंड विकाराचे २ हजार डॉक्टरविविध कारणांमुळे मूत्रपिंड विकाराचे रुग्ण वाढत आहे. परंतु त्या तुलनेत मूत्रपिंड विशेषज्ञांची संख्या फारच कमी आहे. भारताचा विचार केल्यास केवळ दोन हजार विशेषज्ञ आहेत. त्यातही मूत्रपिंड पॅथॉलॉजिस्टची संख्या फक्त ४०च्या आत आहे.
सातपुड्याच्या पायथ्यातील गावांमध्ये मूत्रपिंडाचे सर्वाधिक रुग्ण : धनंजय उखळकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2020 12:56 AM
अनियंत्रित रक्तदाब व मधुमेहामुळे मूत्रपिंड निकामी होण्याचा सर्वाधिक धोका असतो. परंतु हे दोन आजार नसतानाही दक्षिण-पश्चिम विदर्भातील खारपाणपट्ट्यात मूत्रपिंड निकामी रुग्ण, विशेषत: सातपुड्याच्या डोंगरदऱ्याच्या पायथ्याशी असलेल्या छोट्या-छोट्या गावांमध्ये सर्वाधिक दिसून येत आहेत.
ठळक मुद्दे नेफ्रोलॉजी सोसायटीचा वार्षिक सोहळा रविवारी