लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सीबीएसईतर्फे शुक्रवारी दुपारी बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा निकालाची टक्केवारी वाढली असून, जिल्ह्यातील बहुतांश शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे.
कोरोनामुळे यावर्षी पारंपरिक पद्धतीने परीक्षा होऊ शकली नाही. त्यामुळे सीबीएसईने ३०:३०:४० या सूत्राचा वापर केला होता. बारावीच्या वर्षात कनिष्ठ महाविद्यालयीन पातळीवर घेण्यात आलेल्या घटक चाचण्या, प्रात्यक्षिके, प्रथम सत्र परीक्षा यांच्या आधारे निकाल तयार करण्यात आला. या सूत्रात दहावी व अकरावीतील गुणांचादेखील विचार करण्यात आला. दुपारी निकाल जाहीर होताच सीबीएसईच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांनी लॉगइन केले. काही शाळांमध्येदेखील विद्यार्थी पोहोचले होते. शाळांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार मुलांच्या तुलनेत मुलींचा निकाल हा जास्त चांगला राहिला.
असा होता निकालाचा फॉर्म्युला
३०:३०:४० या सूत्रात दहावी व अकरावीच्या गुणांना ३०:३० टक्के वजन देण्यात आले. तर बारावीच्या घटक चाचण्या, प्रात्यक्षिके, सत्र परीक्षा, प्री-बोर्ड परीक्षा यांच्यातील कामगिरीच्या आधारे उर्वरित ४० टक्के गुणांचे वाटप झाले. शाळांनीच हे गुण मंडळाला पाठविले.