आॅनलाईन लोकमतनागपूर:विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनात आलेले बहुतांश आमदार त्यांच्यासाठी असलेल्या आमदार निवासात राहत नाहीत. शहरातील बड्या हॉटेल्समध्ये त्यांचा ‘शाही’ मुक्काम असतो. आमदारांना विधानभवनात घेऊन जाण्यासाठी एसटी बसची व्यवस्था करण्यात आलेली आहे, परंतु या बसेसचा उपयोग फारच थोडे आमदार करतात. स्वत:च्या आलिशान गाड्या असताना त्यांना या बसेसमधून जाणे अप्रतिष्ठेचे वाटते. परंतु या सर्वांना एक सन्माननीय अपवाद आहेत, सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला मतदारसंघातून तब्बल अकरा वेळेस विजयी झालेले ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख. गणपतराव हे सभागृहातील सर्वात ज्येष्ठ सदस्य. ते नागपुरात येताना एसटीने आले आहेत. त्यांचे सध्याचे वय ९१ वर्षाचे आहे. त्यांनी पहिली निवडणूक १९६२ साली जिंकली होती. शेतकरी कामगार पक्षाचे नेते असलेले देशमुख यांची नि:स्पृहता, प्रामाणिकपणा, लोकनिष्ठा आणि निष्कलंक चारित्र्य हीच आयुष्यभराची कमाई. काल-परवापर्यंत फाटका दिसणारा कार्यकर्ता आमदार झाला की अल्पावधीत कोट्यधीश होतो, गाड्यांचा ताफा, दलालांची गर्दी त्याच्या भोवताल असते. हे चित्र सर्वच राजकीय पक्षांत दिसते. अशा निराशेच्या काळातही गणपतराव देशमुख नावाचा हा नि:स्पृह लोकप्रतिनिधी आपले जीवनमूल्य आणि सत्व टिकवून आहे. प्रामाणिक माणसाचा सार्वजनिक जीवनातील तोच नैतिक आधारही आहे. ‘आमदार गणपतराव देशमुख’ तुमचे निरलस आयुष्य आमच्यासाठी दंतकथेचा विषय आहे. तुम्हाला सलाम...
विधीमंडळातील सर्वात ज्येष्ठ आमदार जेव्हा एसटी बसने प्रवास करतात...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 10:21 IST
गणपतराव हे सभागृहातील सर्वात ज्येष्ठ सदस्य. ते नागपुरात येताना एसटीने आले आहेत. त्यांचे सध्याचे वय ९१ वर्षाचे आहे.
विधीमंडळातील सर्वात ज्येष्ठ आमदार जेव्हा एसटी बसने प्रवास करतात...
ठळक मुद्देसोलापूरचे गणपतराव देशमुख अकरा वेळेस विजयी