लाेकमत न्यूज नेटवर्क
कळमेश्वर : लग्नसमारंभ आटाेपल्यानंतर जागेच्या वादातून भांडणाला सुरुवात झाली. यात पाच जणांनी धारदार शस्त्र, लाठ्या व लाेखंडी राॅडने हल्ला चढविल्याने त्यात आई व मुलगा गंभीर जखमी झाले. यात पाेलिसांनी चाैघांना अटक केली असून, एका विधिसंघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेतले आहे. ही घटना कळमेश्वर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील धापेवाडा (खुर्द) येथे साेमवारी (दि. २२) दुपारी १.३० वाजताच्या सुमारास घडली.
मंदा कृष्णा काेठाडे (५४) व सुमित कृष्णा काेठाडे (१९) अशी जखमींची तर मंगेश शेषराव काेठाडे (४२), सचिन शंकर वैद्य (३२), शुभम लहू ढाेले (२०), गाैरव लहू ढाेले (२३) अशी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहेत. हे सर्व जण धापेवाडा (खुर्द), ता. कळमेश्वर येथील रहिवासी आहेत. मंदा यांचे पती कृष्णा यांना दारूचे व्यसन असल्याने या पती, पत्नीमध्ये घरगुती किरकाेळ कारणावरून वाद सुरू हाेता.
कृष्णा काठाेडे पत्नी व मुलासह त्यांच्याच कुटुंबातील लग्न असल्याने ते हळदीच्या कार्यक्रमात सहभागी हाेण्यासाठी गेले हाेते. तिथे या पती, पत्नीमध्ये भांडण झाले. त्यामुळे कृष्णा तिथून घरी निघून गेले. त्यातच भांडण साेडविण्यासाठी गेलेल्या कृष्णाचा भाऊ मंगेश, सचिन, शुभम व गाैरव यांचा मंदा यांच्याशी त्यांच्या घरी जाऊन वाद घालायला सुरुवात केली. तुम्ही लग्नाला का आले, अशी विचारणा करीत चाैघांसह एका विधिसंघर्षग्रस्त बालकाने मंदा व त्यांचा मुलगा सुमित यांच्यावर लाेखंडी राॅड, लाठ्या व धारदार शस्त्राने हल्ला चढवीत मारहाण केली. त्यात दाेघेही गंभीर जखमी झाले.
या प्रकरणात सुमितने पाच जणांविरुद्ध तर गाैरव ढाेले यांने सुमित काेठाडे याच्या विराेधात तक्रार नाेंदविली आहे. कृष्णा काेठाडे आपले मामा असून, मामी मंदा व मामेभाऊ सुमित यांनी आपल्याला मारहाण केल्याचे त्याने तक्रारीत नमूद केले आहे. दुसरीकडे, जागेच्या वादातून भांडणाला सुरुवात झाल्याचे पाेलीस सूत्रांनी सांगितले. याप्रकरणी कळमेश्वर पाेलिसांनी मंगेश, सचिन, शुभम व गाैरवविरुद्ध भादंवि ३०७, ३२४, ३२३, ५०४, ५०६ १४३, १४७, १४८, १४९ अन्वये गुन्हा नाेंदवून चाैघांना अटक केली तर विधिसंघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेतले. या घटनेचा तपास सहायक पाेलीस निरीक्षक मनाेज खडसे करीत आहेत.