लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: नागपूर- वर्धा मार्गावर एका भरधाव ट्रॅव्हल्सने कारला जबर धडक दिली. त्यात आईसह मुलाचा मृत्यू झाला. तर त्याच कुटुंबातील तिघे जखमी झाले. हा अपघात हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जामठा शिवारात रविवारी (दि. २१) सायंकाळी ५ वाजातच्या सुमारास झाला.अभिजित चंद्रकांत जोशी (३५) आणि त्याची आई आशा चंद्रकांत जोशी (६०) अशी मृतांची नावे आहेत. जखमींमध्ये मृत अभिजितचा भाऊ मिलिंद जोशी (२८), अभिजितची पत्नी सृष्टी जोशी (३०) आणि मुलगी गार्गी जोशी (७) सर्व रा. रुक्मिणीनगर, वर्धा यांचा समावेश आहे. मिलिंद हा अविवाहित असून त्याच्या लग्नासाठी वधूपक्षाकडे चर्चा करण्यासाठी सर्वजण नागपूरला आले होते. त्यांच्यासह भंडारा येथून अभिजितचे जावई नितीन कुळकर्णी आणि बहीणसुद्धा आली होती. नागपुरात वधूपक्षाकडे रविवारी बोलणी झाल्यानंतर जोशी कुटुंब हे आपल्या एमएच-३१/ईए-८८३४ क्रमांकाच्या कारने वर्धाकडे जात होते. दरम्यान जामठ्याजवळ बुटीबोरीकडून नागपूरकडे येणाऱ्या एमएच-३०/पी-९९९५ क्रमांकाच्या ट्रॅव्हल्सने कारला जबर धडक दिली. त्यात कारमधील अभिजित आणि त्याची आई आशा यांचा मृत्यू झाला. तर त्याचा भाऊ, पत्नी आणि मुलगी जखमी झाले. अपघातानंतर या मार्गाने ये-जा करणाऱ्या नागरिकांनी हिंगणा पोलिसांना सूचना दिली. त्यानंतर लगेच जखमींना हॉस्पिटलमध्ये भरती केले. जखमींपैकी सृष्टी जोशी यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.या प्रकरणी हिंगणा पोलिसांनी ट्रॅव्हल्स चालक मोहम्मद अहफाज अब्दुल रहीम (५३, रा. निराला सोसायटी, ताजबाग, नागपूर) याच्याविरुद्ध भादंविच्या कलम २७९, ३३८, ३०४ (अ) सहकलम १८४ मोटर वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. आरोपीला हिंगणा पोलिसांनी अटक केली आहे.
नागपूर-वर्धा रोडवर ट्रॅव्हल्सच्या धडकेत आईसह मुलगा ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 10:42 AM
नागपूर- वर्धा मार्गावर एका भरधाव ट्रॅव्हल्सने कारला जबर धडक दिली. त्यात आईसह मुलाचा मृत्यू झाला. तर त्याच कुटुंबातील तिघे जखमी झाले.
ठळक मुद्देएकाच कुटुंबातील तिघे जखमीजामठ्याजवळ कारला अपघात