लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : घरातून केवळ अकरा वर्षीय मुलीचा नमुना पॉझिटिव्ह येताच तिच्यापेक्षा तिची आईच घाबरली. मुलीला रुग्णालयात कसे एकटे ठेवणार म्हणून तीही तिच्यासोबत रुग्णालयात राहू लागली. १४ दिवसानंतर मुलीचा नमुना तपासण्यात आला. ती निगेटिव्ह आली. परंतु तिच्या आईचा नमुना पॉझिटिव्ह आला. सोमवारी सायंकाळी मुलगी रुग्णालयातून घरी जात असताना तिच्या आईची कोविड वॉर्डात भरतीची प्रक्रिया सुरू होती. मेयोमध्ये हे पहिल्यांदाच घडले.सतरंजीपुरा येथील कोरोनाबाधित मृताकडून व त्यांच्या नातेवाईकांकडून कोरोनाचा संसर्गाचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. संशयित म्हणून पंधराशेवर लोकांना क्वारंटाईन करण्यात आले. यात सतरंजीपुऱ्यातील हेसुद्धा कुटुंब होते. संशयित म्हणून या कुटुंबाला रविभवन येथे क्वारंटाईन करण्यात आले. त्याच दिवशी ११ वर्षीय मुलीसह तिची आई व वडिलांचे नमुने घेऊन तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. २० एप्रिल रोजी याचा अहवाल प्राप्त झाला. घरातून केवळ मुलीचेच नमुने पॉझिटिव्ह तर आईसह तिच्या वडिलांचे नमुने निगेटिव्ह आले. मुलीला मेयोमध्ये घेऊन जाण्यासाठी मनपा आरोग्य विभागाचे पथक धडकले. मुलीसोबत तिची आई घाबरली. ती रुग्णालयात एकटी कशी राहणार म्हणून मुलीसोबत मलाही ठेवा म्हणून तिच्या आईने डॉक्टरांकडे गळ घातली. डॉक्टरांनी स्थिती लक्षात घेऊन मुलीसोबत आईलाही रुग्णवाहिकेत बसविले. मेयोच्या वॉर्ड क्र. ६ मध्ये तिच्यावर उपचार सुरू झाले. तिची आई तिची दिवस-रात्र काळजी घेत होती. सातव्या दिवशीचा मुलीचा नमुना निगेटिव्ह येताच सर्वाधिक आनंद तिच्या आईला झाला. आता लक्ष पुढील सात दिवसानंतर तपासल्या जाणाºया नमुन्यांवर होते. २४ तासांच्या अंतराने दोन नमुने तपासले जाणार होते. दोन मे रोजी मुलीचा पहिला नमुना घेण्यात आला. तो निगेटिव्ह आला. तीन मे रोजी तिचा दुसरा नमुना घेण्यात आला. आई तिच्यासोबत राहत असल्याने तिचाही नमुना घेऊन प्रयोगशाळेत पाठविण्यात आला. याचा अहवाल सोमवारी सायंकाळी आला. यात त्या मुलीचा नमुना निगेटिव्ह तर आईचा नमुना पॉझिटिव्ह आला. त्या कुटुंबाला पुन्हा धक्काच बसला. त्याच दिवशी सायंकाळी मुलीला रुग्णालयातून सुटी देण्यात आली, तर आईची कोविड वॉर्डात उपचारासाठी रवानगी करण्यात आली. पुढील १४ दिवस तिला आता रुग्णालयात काढावे लागणार आहेत.