अवयवदान सप्ताह
सुमेध वाघमारे
नागपूर : आई म्हणजे ममता, या शब्दातच माया दडलेली आहे. जन्म देऊन जगात आणणारी आई आणि आता मुलाला अवयवदान करून जीवनदान देणारीही आईच. ती एखाद्या देवाचे रूप ठरत आहे. कारण, एकट्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ६० मूत्रपिंड प्रत्यारोपणात आईचा सिंहाचा वाटा आहे. तिने स्वत:चा जीव धोक्यात घालून १७ मुला-मुलीला मूत्रपिंड दान करून पुन्हा एक जीवन दिले आहे.
अवयवदानाचे अनन्यसाधारण महत्त्व आता समाजात रुजायला लागले आहे. विशेषत: नातेवाईक असह्य दु:खात बुडाले असताना, स्वत:ला सावरत आपल्या माणसाचे अस्तित्व कायम ठेवण्याचा निर्णय घेत आहेत. त्यांच्या या संयम आणि मानवतावादी भूमिकेमुळे नागपुरात ‘ब्रेन डेड’व्यक्तींकडून अवयवदानाचा आकडा वाढत आहे. तर मेडिकलने पुढाकार घेतल्यामुळेच सुपर स्पेशालिटी रुग्णालयात मूत्रपिंड प्रत्यारोपणाची सोय उपलब्ध होऊ शकली आहे. यामुळेच ‘लाईव्ह’ मूत्रपिंड प्रत्यारोपणाचा आकडाही वाढत चालला आहे. मूत्रपिंड निकामी झालेल्यांसाठी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल वरदान ठरत आहे.
- आईच्या दानातूनच प्रत्यारोपणाची सुरुवात
सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये पहिले मूत्रपिंड प्रत्यारोपण ९ फेब्रुवारी २०१६ रोजी यशस्वी पार पडले. याची सुरुवातही आईकडूनच झाली. या पहिल्या प्रत्यारोपणामध्ये आईने मुलीला मूत्रपिंड दान केले होते. आतापर्यंत झालेल्या प्रत्यारोपणात आईकडून दोनवेळा २ तर १५ वेळा मुलाला मूत्रपिंड दान केले.
- मूत्रपिंड दानात पत्नीचाही पुढाकार
यमाच्या मागे जाऊन सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचविले होते, अशी आख्यायिका आहे. मात्र, आताच्या आधुनिक आणि तंत्रज्ञानयुक्त काळातील सावित्रीनेही आपल्या सत्यवानाला मूत्रपिंड दान करून मृत्यूच्या दाढेतून परत आणले आहे. ‘सुपर’मध्ये झालेल्या मूत्रपिंड प्रत्यारोपणातील सहा प्रकरणात पत्नीने पतीला मूत्रपिंड दान करून जीवनदान दिले आहे.
- बहिणीने वाचविला भावाचा संसार
बहिणीने बहिणीला मूत्रपिंड दान करण्याचीही एकमेव घटना ‘सुपर’मध्ये घडली. तर, दोन प्रकरणात बहिणीकडून भावाला मूत्रपिंड दान करून त्याचा संसारही वाचविला आहे. तीन प्रकरणात वडिलांनी मुलाला मूत्रपिंड दान केल्याची नोंद आहे.