नागपूर : आई कोरोनाबाधित असल्यास नवजात शिशूला कोरोना होऊ शकतो. परंतु अशा परिस्थितीत घाबरण्याची गरज नाही. आईने कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन करावे. विशेषत: हात व कपड्यांची स्वच्छता व मास्कचा वापर करून बाळाला स्तनपान द्यावे. हा संदेश आशा, अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून घराघरात पोहोचविणे गरजेचे आहे, असे आवाहन मेडिकलच्या बालरोग विभागाच्या प्रमुख डॉ. दीप्ती जैन यांनी येथे केले.
जिल्हा प्रशासनाच्यावतीने कारोनाची तिसरी लाट आणि म्युकर मायकोसिससंदर्भात लोकजागृती अभियानाला सुरुवात झाली आहे. या अभियानाचा भाग म्हणून डॉ. जैन बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर उपस्थित होते.
डॉ. जैन म्हणाल्या, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत बालकांना धोका संभविण्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. अशात सर्व बालकांकडे आणि त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. विशेषत: ग्रामीण भागातील बाळांच्या आरोग्याकडे बारकाईने लक्ष देणे गरजेचे आहे. लहान मुलांना कोरोनाची लागण झाल्यास ताप, सर्दी, खोकला, मळमळ, उलटी, पोट दुखणे, जुलाब अशी लक्षणे दिसू शकतात. ही लक्षणे दिसताच तातडीने उपचारात्मक पावले उचला. डॉक्टरांच्या सल्ल्याने रॅपिड अॅँटिजन टेस्ट व आरटीपीसीआर करून आजाराचे निदान करून औषधोपचार घ्या, असेही त्या म्हणाल्या.
जिल्हाधिकारी ठाकरे यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या संदर्भात प्रशासनातर्फे करण्यात येत असलेल्या आवश्यक उपाययोजनांची माहिती दिली. आशा वर्कर, अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून कोरोना व म्युकरमायकोसिसच्या आजाराची माहिती सामान्यांपर्यंत पोहचविण्याचे आवाहन कुंभेजकर यांनी केले.
-कोरोनाबाधित मुलांसाठी हे करा
v लक्षणे दिसताच डॉक्टरांशी संपर्क साधा
बालकांना भरपूर पाणी पाजा.
v बालकांना पातळ आहार द्यावा.
v ताप, ऑक्सिजन पातळी मोजत रहा.
v १०० फॅरनहिट किंवा त्यापेक्षा जास्त ताप असेल तर पॅरासिटामॉल द्या.
v ताप असल्यास दर सहा तासांनी पॅरासिटामॉल देता येईल.
v कोरोनासारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष करून नका.
v बाळाला श्वसनास त्रास होत असेल तरी दवाखान्यात न्यावे.
v भूक कमी होणे, बाळ सुस्त असल्यास तातडीने सल्ला घ्यावा.