नागपूर : स्टार बसचा धक्का लागल्यामुळे दुचाकीवर स्वार महिला खाली पडली. गंभीर जखमी झाल्यामुळे तिचा मृत्यू झाला. तर तिचा मुलगा किरकोळ जखमी झाल्याची घटना मानेवाडा बेसा मार्गावर परिवर्तन चौकात बुधवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास घडली.
सुषमा गजानन पाठक (५५, रा. मंगलदीपनगर, बेसा रोड, मानेवाडा) असे मृत महिलेचे नाव आहे. त्या मुलगा प्रतीक गजानन पाठक (२६) याच्या सोबत दुचाकी क्रमांक एम. एच. ३१, बी. पी. ६६८८ ने जात होत्या. परिवर्तन चौकात स्टार बस क्रमांक एम. एच. ३१, सी. ए-६२२४ चा चालक आरोपी गजानन ज्ञानेश्वर ठाकरे (४५, वकीलपेठ, इमामवाडा) याने आपल्या ताब्यातील बस भरधाव व निष्काळजीपणे चालवून प्रतीकच्या दुचाकीला धक्का दिला. यात प्रतीकची आई सुषमा या खाली पडून गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी मेडिकलमध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी प्रतीकने दिलेल्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलिसांनी आरोपी स्टार बस चालकाविरुद्ध भादंवि कलम ३०४ (अ), २७९, ३३७, सहकलम १३४, १७७ नुसार गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे.
जमावाचा उद्रेक
स्टार बसने धक्का दिल्यामुळे दुचाकीवरून खाली पडून महिलेचा मृत्यू झाल्याचे पाहून मानेवाडा-बेसा मार्गावरील परिवर्तन चौकात तणावाची स्थिती निर्माण झाली. यावेळी संतप्त जमावाने रागाच्या भरात स्टार बसच्या काचा फोडल्या. काही काळ येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु, हुडकेश्वर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून जमावाला शांत केले.