माैदा (नागपूर) : तीन महिन्यांच्या चिमुकलीचे नामकरण करण्यापूर्वी तिला दर्शनासाठी आणले हाेते. दर्शन आटाेपल्यानंतर घरी परत जात असताना भरधाव ट्रेलरने दुचाकीला जाेरात धडक दिली. यात चिमुकलीसह तिच्या आईचा मृत्यू झाला तर वडील व आजी गंभीर जखमी झाले. ही घटना माैदा शहराजवळ गुरुवारी (दि. १) दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली.
मृतांमध्ये प्रांजल राजहंस वाघमारे (वय २२) यांच्यासह तीन महिन्यांच्या चिमुकलीचा समावेश असून, राजहंस किसान वाघमारे (२८) व अंजना किसान वाघमारे (४५) अशी जखमींची नावे आहेत. वाघमारे कुटुंबीय कुही तालुक्यातील चिकना (डोंगरमौदा) येथील रहिवासी असून, प्रांजल अंगणवाडी सेविका हाेत्या. राजहंस व प्रांजल यांनी नामकरणापूर्वी मुलीला माैदा येथील परमात्मा एक सेवक आश्रमात दर्शनासाठी आणले हाेते. दर्शन आटाेपल्यानंतर चाैघेही दुचाकीने (एमएच-४०/सीई-२९२६) गावी परत जायला निघाले.
माैदा शहराजवळील नागपूर-भंडारा राष्ट्रीय महामार्गावरील रबडीवाला टी पाॅईंटवर भंडाऱ्याहून नागपूरच्या दिशेने वेगात जाणाऱ्या ट्रेलरने (जीजे-१२/बीएक्स-३४२३) त्यांच्या दुचाकीला जाेरात धडक दिली. यात चिमुकलीसह तिच्या आईचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर वडील व आई गंभीर जखमी झाले. त्या दाेघांवर माैदा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी माैदा पाेलिसांनी ट्रेलर चालकाविरुद्ध गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे.
अपघातप्रवण स्थळ
रबडीवाला टी पाॅईंट अपघातप्रवण स्थळ आहे, असे असतानाही दुचाकीचालक राजहंस वाघमारे याने हेल्मेट घातलेले आहे. नागपूर-भंडारा महामार्गाचे चाैपदरीकरण करतेवेळी आणि त्यानंतरही या ठिकाणी फ्लायओव्हर बांधण्याची मागणी वारंवार करण्यात आली. त्यासाठी लाेकप्रतिनिधींसह सार्वजनिक बांधकाम विभाग व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना निवेदने देण्यात आली; परंतु कुणीही ही मागणी मनावर घेतली नाही. अपघात हाेताच घटनास्थळी नागरिकांनी गर्दी करीत फ्लायओव्हरची मागणी रेटून धरली हाेती. पाेलिस अधिकाऱ्यांनी त्यांची समजूत काढून शांत केले.