नागपूर : मुलाने तयार केलेले दोन व्हिडिओ गेम व गुगल क्लास रुम आयडी हॅक करण्यात आल्यामुळे आईने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी आणि व्हिडिओ गेम व गुगल क्लास रुम आयडी परत मिळवून द्यावा, अशी मागणी त्यांनी न्यायालयाला केली आहे.
माधुरी महाकाळकर असे आईचे तर, अंश असे मुलाचे नाव आहे. ते वर्धा येथील रहिवासी आहेत. त्यांच्या याचिकेवर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अविनाश घरोटे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने राज्य सरकार व इतर प्रतिवादींना नोटीस बजावून उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. अंशने ‘जी गुरुजी’ व ‘ग्लीच’ हे दोन व्हिडिओ गेम तयार केले होते. तो २०१६ पासून या गेमवर परिश्रम घेत होता. अनेक जण हे गेम खेळत होते. त्यामुळे अंशचे नाव चर्चेत आले होते. परिणामी, सायबर गुन्हेगारांनी हे गेम हॅक केले, असा दावा महाकाळकर यांनी केला आहे. याचिकाकर्तीतर्फे ॲड. राजू कडू व ॲड. आर. डी. बाविसकर यांनी कामकाज पाहिले.