लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - ठिय्यावर मजुरी करून कुटुंबाचा गाडा रेटणाऱ्या सासू-सुनेला संमोहित करून तीन आरोपींनी त्यांचे दागिने लटुून नेले. पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी दुपारी १२ ते १२. ३० च्या दरम्यान ही घटना घडली.
भांडेवाडीतील गृहलक्ष्मीनगरात राहणारी ठगियाबाई गेंदराम वर्मा (वय ४५) आणि तिची सून मीरा (वय ३२) या कुटुंबाचा गाडा रेटण्यासाठी मिळेल ते मोलमजुरीचे काम करतात. नेहमीप्रमाणे त्या दोघी गुरुवारी सकाळी ठिय्यावर गेल्या. मात्र, दिवसभर पाणी असल्याने त्यांना दुपारी १२ वाजेपर्यंत कोणतेही काम मिळाले नाही. त्यामुळे त्या घराकडे परत निघाल्या. अण्णाभाऊ साठे गार्डनजवळ त्यांना एक पुरूष, एक महिला आणि त्यांच्यासोबतचा अंदाजे १६ वर्षे वयाचा एक मुलगा मिळाला. मुलाने सासू-सुनेला एटीएम कुठे आहे, असे विचारले. बोलता बोलता आरोपींनी सासू-सुनेभोवती गोल चक्कर मारला. त्यानंतर सासू-सुनेला काही कळेनासे झाले. त्या आपल्या घराकडे जाण्याऐवजी आरोपींच्या मागे चालू लागल्या. काही अंतरावर एका ठिकाणी बसवून आरोपींनी त्यांना आपल्या जवळच्या बाटलीतील पाणी प्यायला दिले आणि नंतर त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मणी-डोरले तसेच कानातील टाप्स असे सुमारे ५० ते ६० हजारांचे दागिने काढून घेतले. बराच वेळेनंतर या दोघी भानावर आल्या. आपले दागिने आरोपींनी काढून नेल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पारडी ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.
आणखी घडणार घटना
अशा प्रकारे संमोहित करून लुटण्याच्या अनेक घटना नागपुरात दोन वर्षांपूर्वी घडल्या होत्या. पोलिसांनी या टोळीवर लक्ष केंद्रित केल्यामुळे नंतर ही टोळी भूमिगत झाली. आता परत ही घटना घडली. वेळीच पोलिसांनी या टोळीला आवरले नाही तर अशा प्रकारच्या घटनांची मालिका पुन्हा सुरू होऊ शकते.
-----