नागपूर: देशात असो किंवा विदेशात आपण सर्वात अगोदर भारतीय आहे हे लक्षात ठेवले पाहिजे. मातृभाषा मातृभूमी आणि आई हे सर्वश्रेष्ठ आहेत. त्यामुळे कुटुंब आणि समाजात वावरताना जास्तीत जास्त प्रमाणात मातृभाषेचा उपयोग केला पाहिजे असे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी केले. बुधवारी भारतीय विद्या भवनच्या सांस्कृतिक केंद्राचे त्यांच्या हस्ते लोकार्पण झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या.
कोराडी येथे झालेल्या या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महालक्ष्मी जगदंबा संस्थानचे अध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे हे प्रामुख्याने उपस्थित होते.
आजची तरुण पिढी शिक्षणासाठी देश विदेशात जाताना दिसते. ते स्थानिक भाषा व संस्कृतीची जुळलेले दिसून येतात. पालकांनी त्यांना मातृभाषेचे देखील शिक्षण दिले पाहिजे भारतीय तो ही आपली ओळख आहे आणि जगात कुठेही असले तरी मातृभूमीला कधीच विसरू नये अशी शिकवण त्यांना दिली पाहिजे. तरुण पिढीला स्वातंत्र्यसंग्रामाची महती सांगणे आवश्यक आहे. त्यांना हुतात्म्यांच्या बलिदानाबाबत माहिती दिली पाहिजे असे देखील राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या.