लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नवरात्र उत्सव म्हणजे नऊ दिवस भक्ती आणि स्त्री शक्तीचा जागरच जणू. भक्ती आणि उत्साही वातावरणाचा संगम असलेला हा काळ तमाम भक्तांना सुखावणारा असतो. असा सुखावणारा अनुभव राणी लक्ष्मीबाई दुर्गा उत्सव मंडळ व लोकमत यांच्या संयुक्त विद्यमाने लक्ष्मीनगरच्या व्हॉलिबॉल मैदानावर सुरू असलेल्या दुर्गा उत्सवात भाविकांना येत आहे. गुरुवारी दुर्गादेवीला भक्तिस्वरांचा अभिषेक घालत शक्तीचा जागर करण्यात आल्याने लक्ष्मीनगरच्या परिसरात अधिकच उत्साह संचारला.शहरातील प्रसिद्ध गायक व स्वरतरंगचे नीरंजन बोबडे व त्यांच्यासमवेत आलेल्या विदर्भातील ९० कलावंतांनी अप्रतिम सादरीकरणातून मातेला स्वरांचा अभिषेक केला. नीरंजन यांच्यासह यामिनी पायघन यांचे गायन, वाद्यवृंदांचे वादन व कलावंतांच्या अप्रतिम नृत्याविष्काराने आईला भक्तांवर कृपादृष्टी ठेवण्यासाठी साकडे घालण्यात आले. संकल्पना नीरंजन बोबडे तर निवेदन आसावरी गलांडे-देशपांडे यांचे होते. श्रीगणेशाची आराधना करीत ‘मोरया मोरया...’ या गीतावर सुंदर नृत्य व नीरंजन यांच्या ‘देवा श्रीगणेशा...’ या गीताने भक्तीचे सूर निनादले. यामिनी यांनी ‘आदिमाया अंबाबाई...’ ने मातेला साकडे घातले. ‘लल्लाटी भंडार...’ या नृत्याला भाविकांच्या टाळ्यांचा प्रतिसाद मिळाला. यानंतर नीरंजनच्या स्वरात ‘माझे माहेर पंढरी..., मल्हारवारी..., खंडेरायाच्या लग्नाला..., तुने मुझे बुलाया..., आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्तांना..., शिर्डीवाले साईबाबा...’ या भक्तिगीतांतून चारी दिशांनी भक्तीचा नाद घुमला. मार्तंड मल्हार..., गंगा सरस्वती.., कालितांडव शिवतांडव... व पोवाड्यावरील नृत्यातून भक्तीचा जागर करण्यात आला. ‘माउली माउली...’ यावर वादन, गायन व नृत्यातून दिंडी काढत या नादमय भक्तिस्वरांचा समारोप झाला.मुस्लिम बांधवांनी केली मातेची आरती सर्वधर्मसमभाव व धर्मनिरपेक्षतेचा संदेश देणाऱ्या राणी लक्ष्मीबाई दुर्गा उत्सव मंडळ व लोकमतच्या दुर्गा उत्सवात गुरुवारी एक अनोखे व प्रेरणादायी दृश्य अनुभवण्यास मिळाले. मानवसेवा लोककल्याण राष्ट्रीय महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजा सिद्दीकी, मोहम्मद शोएब अहमद, अॅड. जिशान खान, शकील अहमद, अकील अहमद व महासंघाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते गुरुवारी दुर्गा मातेची आरती करण्यात आली. हे दृश्य भारतातील धार्मिक ऐक्याची साक्ष पटविणारे ठरले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष प्रसन्ना मोहिले यांच्यासह अमोल अन्वीकर, आनंद कजगीकर, रेणू मोहिले, समृद्धी पुणतांबेकर, वैभव पुणतांबेकर, अर्पित मंगरुळकर व मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दररोज हजारो भाविक या दुर्गा उत्सवाला भेट देत आहेत. चांद्रयान मोहिमेचा देखावा तसेच छत्रपती शिवरायांच्या जीवनावरील छायाचित्र प्रदर्शनानेही भाविकांना भुरळ पाडली आहे.
आई कृपा करी, माझ्यावरी, जागवितो रात सारी...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2019 12:38 AM
शहरातील प्रसिद्ध गायक व स्वरतरंगचे नीरंजन बोबडे व त्यांच्यासमवेत आलेल्या विदर्भातील ९० कलावंतांनी अप्रतिम सादरीकरणातून मातेला स्वरांचा अभिषेक केला.
ठळक मुद्देदुर्गा मातेला भक्तीचा स्वराभिषेक : राणी लक्ष्मीबाई दुर्गा उत्सव मंडळ व लोकमत दुर्गोत्सव