- श्रीनिकेत मिश्रा : विद्यापीठात जागतिक मातृभाषा दिन
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तळागाळातील लोकांपर्यंत शिक्षण पोहोचावे म्हणून भारत सरकारने नव्या शैक्षणिक धोरणात मातृभाषेला सर्वाधिक महत्त्व दिले आहे. मातृभाषेतून शिक्षण घेता येणार असल्याने भविष्यात शिक्षणाचा अधिक जोमाने प्रसार होणार असल्याचे मत वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठातील साहाय्यक प्राध्यापक डॉ. श्रीनिकेत मिश्रा यांनी व्यक्त केले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या भाषाशास्त्र आणि परकीय भाषा विभागाच्या वतीने जागतिक मातृभाषा दिनानिमित्त एका बहुभाषिक कार्यक्रमाचे आयोजन आभासी माध्यमातून करण्यात आले. यावेळी विशेष अतिथी म्हणून डॉ. मिश्रा बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून धनवटे नॅशनल महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागप्रमुख डॉ. बिपाशा घोषाल, विद्यापीठाच्या भाषाशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. शैलेन्द्र कुमार, बिंझाणी महिला महाविद्यालयाच्या प्रा. स्मिता पाणूरकर हे मान्यवर सहभागी झाले होते.
प्रा. स्मिता पाणूरकर यांनीही यावेळी मातृभाषेबद्दल मार्गदर्शन केले. कुठलीही भाषा ही अक्षरांपासून निर्माण होते. जे क्षर होत नाही ते अक्षर. भाषा मुळात अर्थांचे अनेक आयाम घेऊन येत असते. आपल्या अस्तित्वाच्या, अस्मितेच्या शोधाचा प्रवास आपली मातृभाषा आहे. याप्रसंगी त्यांनी वेद आणि मीमांसादर्शनातील तत्त्वज्ञानाच्या माध्यमातून हा विषय समजावून सांगितला. याप्रसंगी प्रतिभा दास, योगिता झरारिया, यातिका तिघारे, डिंपल गणात्रा, सोनू सूद, मालती तुरक, हर्षा कामठे, अमिषा प्रसाद, पूर्वा कठाळे, स्नेहल रामटेके, स्वरदा गीबे, साक्षी भामरे, वैष्णवी देशमुख, मधुसूदन राजणकर, प्रीतिनंदा गणवीर या विद्यापीठात विविध परकीय भाषा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांचे सादरीकरण केले.
कार्यक्रमाला प्रा. सुनील सेनगुप्ता, प्रा. सुमन लक्ष्मी, डॉ. नटराजन, डॉ. शैलेन्द्र सिंग, डॉ. पारुल उपाध्याय, डॉ. ज्योतिमणी रॉक, प्रा. ओम चौधरी उपस्थित होते. संचालन मधुसूदन राजणकर यांनी, तर स्मिता पाणूरकर यांनी आभार मानले. डॉ. शैलेन्द्रकुमार यांनी प्रास्ताविक केले.
..............