मातृत्व जिंकलं! बलात्काराच्या आघातावर मात, कोर्टाच्या संमतीनंतरही गर्भपाताचा निर्णय बदलला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2022 10:26 AM2022-04-30T10:26:07+5:302022-04-30T10:30:37+5:30

मुलीने स्वत:वरील शारीरिक-मानसिक आघातासह इतर सर्व वेदना पचवून बाळाला जन्म देण्याचा निर्धार केला.

Motherhood wins! Overcoming the trauma of rape, the decision of abortion was changed even after the consent of the high court | मातृत्व जिंकलं! बलात्काराच्या आघातावर मात, कोर्टाच्या संमतीनंतरही गर्भपाताचा निर्णय बदलला

मातृत्व जिंकलं! बलात्काराच्या आघातावर मात, कोर्टाच्या संमतीनंतरही गर्भपाताचा निर्णय बदलला

googlenewsNext

राकेश घानोडे

नागपूर : आई... ही अशी एकमेव स्त्री आहे, जी बाळाचा चेहरा बघायच्या आधीपासूनच त्याच्यावर प्रेम करायला लागते. आईचे मुलावरील प्रेम सर्वश्रेष्ठ असते. त्यामुळेच गर्भपाताचा निर्णय घेतलेल्या एका बलात्कार पीडित मुलीमध्ये लपलेली करुणामय आई वरचढ ठरली. मुलीने स्वत:वरील शारीरिक-मानसिक आघातासह इतर सर्व वेदना पचवून बाळाला जन्म देण्याचा निर्धार केला.

ही मुलगी अकोला जिल्ह्यातील रहिवासी असून, ती अल्पवयीन आहे. तिचे एका मुलावर प्रेम होते. दरम्यान, त्या मुलाने लग्न करण्याचे वचन देऊन तिच्यावर वारंवार बलात्कार केला. त्यामुळे तिला गर्भधारणा झाली. त्यानंतर मुलाने तिला टाळणे सुरू केले व तिच्यासोबतचा संपर्क तोडला. परिणामी, मुलीवर प्रचंड मानसिक आघात झाला. तिला या कटू आठवणींसह जगणे नकोसे झाले. करिता, जीवनातील हे वेदनादायी प्रकरण कायमचे पुसून टाकून नवीन आयुष्य सुरू करण्यासाठी तिने गर्भपाताचा निर्णय घेतला होता. परंतु, पुढे मुलीमधील आई अधिक काळ गप्प राहू शकली नाही. काळाच्या ओघात गर्भातील बाळाप्रती निर्माण झालेले प्रेम, जिव्हाळा व आपुलकीने तिला गर्भपाताचा निर्णय बदलण्यास भाग पाडले. ती मुलगी आता बाळाला जन्म देणार आहे.

उच्च न्यायालयाने दिली होती परवानगी

संबंधित मुलीने गर्भपाताची परवानगी मिळविण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. ३० मार्च २०२२ रोजी उच्च न्यायालयाने वैद्यकीय तपासणी अहवालाच्या आधारावर तिला गर्भपात करण्याची परवानगी दिली होती. गर्भपाताचा निर्णय बदलल्यानंतर तिने परत उच्च न्यायालयात धाव घेऊन बाळाला जन्म देण्याची इच्छा व्यक्त केली. उच्च न्यायालयाने यावेळीही तिला दिलासा दिला व गर्भपाताच्या परवानगीचा आदेश प्रभावहीन झाल्याचे जाहीर केले.

Web Title: Motherhood wins! Overcoming the trauma of rape, the decision of abortion was changed even after the consent of the high court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.