जिल्ह्यातील एकूण शाळा - ७५४
सुरू झालेल्या शाळा - १२३
अद्याप बंद असलेल्या शाळा - ६३१
काटोल/उमरेड : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोविडची दुसरी लाट आटोक्यात येत आहे. त्यामुळे शिक्षण विभागाच्या सूचनेनुसार ग्रामपंचायत आणि पालकांच्या सहमतीने ८ वीनंतरचे वर्ग सुरू करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासाठी जिथे कोविडचे रुग्ण नाहीत अशा गावात ग्रामसभांच्या माध्यमातून गावातील शाळा सुरू करण्याबाबतचे ठराव घेतले जात आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत १२३ शाळात ८ वीनंतरचे वर्ग सुरु झाले आहे. सोमवारी (दि.१९) यात आणखी वाढ होणार आहे. त्यामुळे मुलांना शाळेत पाठविताना पालकांनी विशेषत: आईने विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
गतवर्षी मार्चच्या शेवटी लॉकडाऊमुळे जिल्ह्यातील शाळा बंद करण्यात आल्या होत्या. मात्र शिक्षणाची प्रक्रिया निरंतर सुरू राहावी यासाठी ऑनलाईन शिक्षण पद्धतीला प्राधान्य देण्यात आले होते. मात्र ग्रामीण भागात विद्यार्थ्यांकडे अॅन्ड्रॉईड मोबाईल नसणे आणि असलाच तर इंटरनेट कॅनेक्टिव्हीटीची अडचण. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण पद्धतीत सातत्याने व्यत्यय येत गेला. मात्र दीड वर्षापासून शाळा निरंतर बंद असल्याने विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान झाले. सध्या कोविडची परिस्थिती आटोक्यात असल्याने सरकारने शाळा सुरु करण्याबाबत पुढाकार घ्यावा अशी भूमिकाही काही पालकांनी मांडली होती. मात्र कोविडची संभाव्य तिसरी लाट विचारात घेत शाळेत कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे अशी अपेक्षा शिक्षण विभागाची होती. त्यामुळे शाळेत विद्यार्थी सुरक्षित राहावा यासाठी शिक्षक आणि पालकांनी तेवढीच काळजी घेणे गरजेचे असल्याचा सूर ग्रामसभामधून व्यक्त केला जात आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण भागात सध्या कोविडचे ७८ रुग्ण आहे. शनिवारी तेरा तालुक्यात केवळ ४ रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे बहुतांश गावांची वाटचाल कोरोनामुक्तीकडे आहे. मात्र रुग्णसंख्येत वाढ होऊ नये यासाठी सर्वांनी दक्ष राहणे गरजेचे आहे.
काळजी आहेच, पण शिक्षणही महत्त्वाचे!
--
कोविडमुळे दीड वर्षांपासून शाळा बंद आहे. शहरी भागात ऑनलाईन शिक्षण काही प्रमाणात सुरू आहे. मात्र ग्रामीण भागाची परिस्थिती वेगळी आहे. मानवी मेंदूचा विचार केला तर विस्मरण आलेच. मार्च २०२० पूर्वी विद्यार्थी जे शिकले ते विसरले. विद्याप्राधिकरण मार्फत झालेल्या ऑनलाईन सर्व्हेत ९० टक्के पालक विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यास तयार आहे. तेव्हा शैक्षणिक जबाबदारी न झटकता कोविड नियमाचे पालन करून शाळा सुरू करणे आवश्यक आहे.
- अॅड.भैरवी टेकाडे, काटोल
---
शाळा बंद असल्याने मुलांचे शैक्षणिक नुकसान झाले. त्यामुळे शाळा सुरू
होणे गरजेचे आहे. सध्या ऑनलाईन शिक्षण सुरू असले तरी ते पूरक नाही. विद्यार्थ्यांचा मानसिक, नैतिक आणि बौद्धिक विकास त्याद्वारे परिपूर्ण होत नाही. ऑनलाईन शिक्षणामुळे वर्गातील वातावरण घरी तयार होत नाही. त्यामुळे शाळा सुरू करण्यात याव्या.
- चेतना वादाफळे, कोंढाळी
--
आठवीपासून शाळा सुरू झाल्या ही आनंदाची बाब आहे. मुलांच्या बौद्धिक विकासासाठी शाळा सुरू गरजेचे होते. तरीही भविष्यात वर्तविण्यात आलेली तिसरी लाट व पावसाळ्यातील संसर्गजन्य आजार या पासून सावध राहून मुलांना शाळेत पाठवावे लागेल. सोबतच वैयक्तिक स्वच्छता ठेवण्यासाठी मी मुलांना वारंवार सूचना करीत असते. परंतु माझा मुलगा शाळेत असताना वैयक्तिक काळजी घेतो की नाही या बाबत मला चिंता वाटते. दुसरीकडे त्याचे शिक्षणातही खंड पडू नये अशी भीती सुद्धा वाटते.
दीपाली सौदागर, नरखेड
--------
शाळा सुरू झाली. चांगल झालं. मुलांचा घरी अभ्यास होत नाही. पूर्वी फक्त जेवणाचा डबा करून दिला की फारसा ताण नसायचा. आता सॅनिटायझर, मास्क यासह बारीकसारीक बाबींकडे लक्ष द्यावे लागते. थोडी भीती आणि धाकधूक नक्कीच आहे. काळजी घेतली तर फारसे घाबरून जाण्याचे कारण नाही. तरीही मुले शाळेत गेल्यानंतर आणि परत येईस्तोवर काळजी असतेच.
- सीमा ठवकर, गावसूत, ता.उमरेड
शाळेतून घरी येताच कपडे बदला, अंघोळही करा!
ग्रामीण भागात ८ वीनंतरचे वर्ग सुरु झाले असले तरी मुलांनी वैयक्तिक स्वच्छता बाळगणे आवश्यक आहे. सध्या पावसाचे दिवस असल्याने ग्रामीण भागात डेंग्यूचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे मुलांनी स्वत:ची काळजी स्वत: घेणे आवश्यक आहे. यासाठी पालकांनी त्यांच्यासोबत निरतंर संवाद ठेवावा. मुले शाळेतून घरी येताच त्यांना हात स्वच्छ धुवायला लावणे, अंघोळ करायला लावणे आवश्यक आहे.
अ) मास्क काढू नये.
ब) वारंवार हात साबणाने धुवावा किंवा सॅनिटायझर वापरावे.
क) सोशल डिस्टिन्सिंग पाळावे.
ड) घरी आल्यानंतर कपडे धुवायला टाकावेत आणि अंघोळ करावी.