- मुलाचा होप हॉस्पिटलवर आरोप : पोलिसांनी मागितली हॉस्पिटलकडे उपचाराची कागदपत्रे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कामठी रोड, टेकानाका येथील होप हॉस्पिटलमध्ये भरती एका ५७ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. महिलेच्या उपचाराची माहिती देण्यास हॉस्पिटलकडून टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. गुरुवारी १८ मार्च रोजी महिलेला मृत घोषित करण्यात आले. तेव्हापासून कुटुंबीयांमध्ये हॉस्पिटलविषयी असंतोष पसरला आहे. आशा मेश्राम (रा. बँक कॉलनी, नारी रोड) असे मृत महिलेचे नाव आहे.
मृत महिलेचा मुलगा तुषार मेश्राम यांच्या म्हणण्यानुसार, आशा मेश्राम यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर, १६ मार्च रोजी होप हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी त्यांना भरती करण्यात आले होते. डॉक्टरांनी त्यांचा ऑक्सिजन लेव्हल कमी झाल्याने उपचार सुरू असल्याची माहिती दिली होती. गुरुवारी व्हिडिओ कॉलिंगवर आईसोबत बोलणेही झाले होते. तेव्हा त्यांची प्रकृती उत्तम होती. परंतु, शुक्रवारी डॉ. मुरली यांनी आईला हार्ट अटॅक आल्याचे सांगून ४५ हजार रुपयाचे इंजेक्शन दिले जाणार असल्याचे सांगितले. तुषारचे वडीलही दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये भरती असल्याने, ते संध्याकाळी हॉस्पिटलमध्ये पोहोचले. त्यांनी डॉ. मुरली यांची भेट घेऊन आईच्या प्रकृतीबाबत चौकशी केली. तेव्हा डॉक्टरने कार्डिओ डॉक्टरलाही बोलावले नव्हते. थोड्यावेळाने आईच्या प्रकृतीबाबत माहिती देतो, असे सांगून डॉक्टर निघून गेले. त्यानंतर तुषार यांची रिसेप्शनजवळ डॉ. नागेंद्र यांच्याशी भेट झाल्यावर, त्यांनी आईचा मृत्यू झाल्याचे सांगितले. अचानक असे काय झाले, याबाबत कोणीच सांगायला तयार नव्हते. हॉस्पिटलजवळ अपेक्षित डॉक्टरांची टीमही नसून, हॉस्पिटलच्या निष्काळजीपणामुळेच आईचा जीव गेल्याचा आरोप तुषार यांनी केला आहे. यासंदर्भात डॉ. मुरली यांच्याशी संपर्क केला असता, संपर्क होऊ शकला नाही.
.............