नागपूर : देशातील एकमेव असलेल्या मोतीबागच्या नॅरोगेज संग्रहालयाला १४ डिसेंबरला १२ वर्षे पूर्ण झाली असून, यानिमित्त रेल्वे प्रशासनाच्या वतीने नागरिकांना २० टक्के तर लहान मुलांना तिकिटाच्या दरात ५० टक्के सवलत देण्यात येत आहे.मोतीबाग नॅरोगेज संग्रहालयात नॅरोगेजशी संंबधित मॉडेल, सेवेत असलेले इंजिन, कोच, वॅगन ठेवण्यात आले आहेत. संग्रहालयाची स्थापना भारतीय रेल्वेला १५० वर्षे झाल्यानिमित्त १४ डिसेंबर २००२ रोजी करण्यात आली होती. मागील १२ वर्षांत संग्रहालयाला मनोरंजनाच्या आणि शिक्षणाच्या दृष्टीने आकर्षक करण्यात आले आहे. संग्रहालयात प्रदर्शन केलेले इंजिन, कोचच्या माध्यमातून सामान्य नागरिक आणि बालकांना नॅरोगेज पद्धतीची माहिती मिळते. बालकांच्या मनोरंजनासाठी येथे खेळण्याची गाडी, झोपाळा, उद्यान, गोल फिरणारा कोच उपलब्ध आहे. याशिवाय सभागृहात सांस्कृतिक परंपरा आणि रेल्वे सुरक्षेबाबत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. लवकरच संग्रहालयात खाद्यपदार्थ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. संग्रहालयाच्या तिकिटाला नवे रूप देण्यात आले आहे. संग्रहालयात बालकांसाठी आकर्षक कलाकृतींचे चित्रीकरण करण्यात आले आहे. गॅलरीत नवे रंग लावण्यात आले आहेत. तिकीट खिडकी एका गार्डच्या डब्यात तयार करण्यात येत आहे. गोल फिरणारा कोच नेहमीच नागरिकांचे आकर्षण ठरतो. त्यामुळे हा कोच पुन्हा सुरू करण्यात येत असून, तिकिटात समाविष्ट दरात या कोचमध्ये अल्पोपहार करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. याशिवाय संग्रहालयाच्या सभागृहात एक लघुपट प्रदर्शित करण्यात येणार असून, या लघुपटातून रेल्वेचा इतिहास, भारताला जोडण्यात रेल्वेची किती महत्त्वाची भूमिका आहे, दैनंदिन जीवनात रेल्वेचे महत्त्व आदींची माहिती देण्यात येणार आहे. मोतीबाग संग्रहालयाला आकर्षक करण्यासाठी एकूण ३० लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)
मोतीबाग संग्रहालयाला झाली १२ वर्षे
By admin | Published: December 14, 2014 12:41 AM