आनंद डेकाटे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मानवी स्वातंत्र्याच्या संगरात त्यांनी चालवलेल्या वृत्तपत्रांचाही मोठा वाटा राहिला आहे. ही वृत्तपत्रे म्हणजे आंबेडकरी चळवळीचे मुखपत्र होते. बाबासाहेबांनी यांच्या माध्यमातून तत्कालीन परिस्थितीत व्यवस्थेशी कसा लढा दिला, याचे ते साक्षीदार आहेत. पुढच्या पिढीलाही मानवी स्वातंत्र्याचा अभ्यास करण्यासाठी ते पाहता यावे, वाचून अनुभवता यावे यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चालवलेल्या ‘जनता’ व ‘समता’ या ऐतिहासिक वृत्तपत्राचे (पाक्षिक) मूळ अंक कायमस्वरूपी टिकून राहावेत, यासाठी रासायनिक प्रक्रियेद्वारे त्याचे संवर्धन करण्यात येणार आहे. यासंदर्भात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ अमेरिका येथील सेंट्रल फॉर रिसर्च लायब्ररीज शिकागो यांच्याशी एमओयू करण्याच्या तयारीत आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वृत्तपत्राचे महत्त्व माहीत होते. लोकांपर्यंत आपले विचार पोहोचविण्यासाठी त्यांनी विविध वृत्तपत्रे सुरू केली. सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ३१ जानेवारी १९२० रोजी मूकनायक हे पाक्षिक सुरू केले. ते ३१ आॅक्टोबर १९२० पर्यंत चालले. पुढे बाबासाहेब इंग्लंडला गेल्याने ते बंद पडले. ३ एप्रिल १९२७ रोजी ‘बहिष्कृत भारत’ हे वृत्तपत्र सुरू केले. ते १५ नोव्हेंबर १९२९ पर्यंत चालले; नंतर समता १९ जून १९२८ ते १५ मार्च १९२९ पर्यंत चालले. यानंतर जनता हे वृत्तपत्र त्यांनी सुरू केले. जनता हे सर्वाधिक काळ चाललेले वृत्तपत्र आहे. २४ नोव्हेंबर १९३० रोजी याचा पहिला अंक निघाला, तर ते १९५६ पर्यंत सुरू होते. ४ फेब्रुवारी १९५६ मध्ये जनता वृत्तपत्राचे प्रबुद्ध भारत, असे नामांतर करण्यात आले.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय हलाखीच्या परिस्थितीत ही वृत्तपत्रे चालवली. ही केवळ मुखपत्रे नव्हती तर ती चळवळीची साधने होती. बाबासाहेबांनी मानवी स्वातंत्र्याच्या संगरात या साधनांचा खुबीने वापर करीत हा संगर यशस्वी केला.जनता व समताचे मूळ अंक डॉ. आंबेडकर विचारधारा विभागात सुरक्षितबाबासाहेबांनी काढलेल्या वृत्तपत्रांपैकी समता, जनता व प्रबुद्ध भारत या वृत्तपत्राचे मूळ अंक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा विभागात सुरक्षित आहेत. परंतु मूळ अंक आता जीर्ण झालेले आहेत. तत्पूर्वी, ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत व विभागप्रमुख डॉ. प्रदीप आगलावे यांच्या प्रयत्नांमुळे या अंकातील मजकुरांचे डिजिटलायझेशन करण्यात आले आहे. त्यामुळे मूळ अंकातील मजूकर हे नेहमीसाठी सुरक्षित झाले आहेत. डिजिटलयझेशनसंदर्भात विचारधारा विभाग व शासनाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने समिती यांच्यात एक करारही झाला होता. त्यानुसार हे काम झले असून डिजिटलायझेशन झालेले अंक आंबेडकर चरित्र साधने समितीकडे सोपविण्यात आलेले आहे. समिती त्यावरून नव्याने अंक प्रकाशित करणार आहे. परंतु जीर्ण झालेल्या मूळ अंकाचे संवर्धन होणे आवश्यक होते. डॉ. आगलावे हे यासाठी प्रयत्नशील होतेच. यातच त्यांची मुंबई येथील टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्सेस (टीस) या संस्थेच्या प्रा. वर्षा अय्यर यांच्याशी ओळख झाली. त्यांच्याकडून डॉक्युमेंटच्या संवर्धनाचे काम हे अमेरिकेतील सेंट्रल फॉर रिसर्च लायब्ररीज शिकागो ही संस्था करीत असल्याची माहिती मिळाली. डॉ. आगलावे यांनी त्या संस्थेशी संपर्क साधला. शिकागो संस्थेनेही महामानवाच्या वृत्तपत्रांच्या संवर्धनासाठी होकार दिला. ते हे काम स्वत:हून करून देणार आहेत. त्यासाठी कुठलाही खर्च येणार नाही. यासंदर्भात विद्यापठ स्तरावर कराराची प्रक्रिया सुरू आहे. अमेरिकेतील सेंट्रल फॉर रिसर्च लायब्ररीजच्या वतीने साऊथ एशिया ओपन आॅर्क्युझन (एसएओए) ही संस्था समता व जनता या वृत्तपत्राच्या मूळ अंकांच्या संवर्धनाचे काम करेल. संस्थेचे तज्ज्ञ अधिकारी नागपूरला येतील आणि वृत्तपत्राच्या मूळ अंकांवर रासायनिक प्रक्रियेद्वारे त्याचे संवर्धन करतील. यानंतर हे मूळ अंक पुढच्या कित्येक वर्षे सुरक्षित राहतील.भावी पिढी, अभ्यासक व संशोधकांना होणार फायदाडॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेली ही वृत्तपत्रे केवळ मुखपत्रे नाहीत, तर ती चळवळीची साधने आहेत. नवीन पिढीला बाबासाहेबांच्या चळवळीच्या अभ्यासासाठी ही साधने महत्त्वाची आहेतच; परंतु एक संशोधक व अभ्यासकासाठीसुद्धा मानवी स्वातंत्र्याचा संगर बाबासाहेबांनी कसा लढला, हे समजून घेण्यासाठी, तसेच तत्कालीन समाजाचे चित्र, ऐतिहासिक दृष्टिकोन यासाठीसुद्धा ही वृत्तपत्रे अतिशय मोलाची आहेत. त्यामुळे या मूळ अंकांचे कायमस्वरूपी जतन झाल्यास भावी पिढी, अभ्यासक व संशोधकांना ते फायद्याचे ठरेल.डॉ. प्रदीप आगलावे