नागपूर : मुंबई येथे अलीकडेच गॅस सिलिंडर गोडाऊनमध्ये सिलिंडरचा स्फोट होऊन जीवित आणि वित्तहानी झाली. अशीच घटना सर्वत्र होण्याची शक्यता लक्षात घेऊन विदर्भातील स्फोटक पदार्थ आणि गॅस सिलिंडरचे गोडाऊन शहराबाहेर हलवावे, अशी मागणी अ.भा. ग्राहक पंचायतने ऑईल कंपन्या आणि अन्न पुरवठा विभागाकडे केली आहे.
पंचायतचे विदर्भ प्रांत सचिव गजानन पांडे म्हणाले, पूर्वी शहराची लोकसंख्या आणि वस्त्या कमी असल्यामुळे विदर्भातील सर्व गॅस सिलिंडर गोडाऊन शहराबाहेर व वस्त्यांच्या दूर होते. परंतु शहर आणि वस्त्यांची लोकसंख्या वाढल्यामुळे सर्व गोडाऊन दाट वस्त्यांमध्ये आले आहेत. नियमाप्रमाणे गोडाऊन शहराबाहेर व एकांतस्थळी असणे आवश्यक आहे. गॅस एजन्सीमध्ये नियमाप्रमाणे सहापेक्षा जास्त सिलिंडर ठेवता येत नाही. या नियमाचे उल्लंघन करून एजन्सीमध्ये गोडाऊनचे स्वरूप आले आहे. हे एकप्रकारे मिनी गोडाऊन असून दुर्दैवाने स्फोट होऊन अपघात झाल्यास जीवित आणि वित्तहानी होण्याची जास्त शक्यता आहे. याकडे ऑईल कंपन्या आणि अन्न व पुरवठा विभागाचे अधिकारी कारवाईऐवजी दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते. यासंदर्भात पंचायतने अनेकदा शासनाचे लक्ष वेधले आहे.
नागपुरात एखादी गंभीर दुर्घटना झाल्यानंतरच शासनाचे डोळे उघडतील काय, असा सवाल पांडे यांनी केला आहे. एवढेच नव्हे तर हिंदुस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम, इंडियन ऑईल कॉर्पोरेशन आणि पुरवठा विभागाचे अधिकारी जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष तर करीत नाही ना, शिवाय आर्थिक साटेलोटे तर नाही ना, असा सवाल उपस्थित होतो. संबंधित गॅस एजन्सीवर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी पंचायतचे सचिव संजय धर्माधिकारी, जिल्हा संघटन मंत्री गणेश शिरोळे, जिल्हाध्यक्ष प्रवीण शर्मा, उपाध्यक्ष दत्तात्रय कठाळे, शहर अध्यक्ष अनिरुद्ध गुप्ते, शहर सचिव उदय दिवे आणि इतर पदाधिकाऱ्यांनी केली आहे.