निशांत वानखेडे
नागपूर : पावशा किंवा चातक पक्ष्याची आराेळी ऐकली की पाऊस येण्याचे संकेत मिळतात व नांगरणीची कामे सुरू हाेतात. काेकिळेचे गाणे म्हणजे वसंत ऋतूच्या आगमनाचे संकेतच. एखाद्या तलावाजवळ नेहमी दिसणारे पक्षी अचानक गायब झाले की, ताे तलावाचे पाणी किंवा माशांबाबत काहीतरी विपरीत घडल्याचे संकेतच असतात. पक्ष्यांच्या हालचालीवरूनच जैवविविधतेवरील संकट किंवा काही परिवर्तन घडल्याचे संकेत मिळत असल्याचे मत पक्षी अभ्यासक डाॅ. अनिल पिंपळापुरे यांनी व्यक्त केले.
इथनाे ऑर्निथाेलाॅजी म्हणजे मानववंश व पक्षी यांचा सयुक्त अभ्यास असलेल्या शास्त्राचे तज्ज्ञ डाॅ. पिंपळापुरे यांनी लाेकमतशी बाेलताना वर्तमान परिस्थिती व पुरातन गाेष्टींशी असलेल्या संबंधांवर प्रकाश टाकला. पाशाणयुगीन किंवा आदिमानवापासून पक्ष्यांशी संबंध राहिलेला आहे. मानवाने पक्ष्यांना उडताना पाहिले, त्यांचा आहारात उपयाेग केला, औषधी गुणधर्म म्हणूनही उपयाेग केला. वेदपुराणातही असंख्य पक्ष्यांचा उल्लेख आढळताे. रात्री शकुन-अपशकुन, अनेक दंतकथा, श्रद्धा-अंधश्रद्धा, जादूटाेण्याच्या गाेष्टी पक्ष्यांशी संबंधित आहेत.
सध्या अस्तित्वात असलेले गाेंड, काेरकू, माडिया, काेलाम अशा आदिवासी जमाती, पारधी समाज किंवा जुन्या लाेकांना पक्ष्यांविषयी ज्ञान आहे. या पारंपरिक ज्ञानाचा उपयाेग नदी, तलाव, परिसंस्था किंवा जैवविविधता वाचविण्यासाठी केला जाऊ शकताे, याकडे डाॅ. पिंपळापुरे यांनी लक्ष वेधले. भारतात १३००, महाराष्ट्रात ५५०च्यावर, तर विदर्भात ४४०च्या आसपास पक्ष्यांच्या प्रजाती अस्तित्वात आहेत. यातील मधुवा म्हणजे हनी बजार्ड ओरिएंटल या पक्ष्याला ‘नागपूरचा पक्षी’ असे संबाेधले जाते. काही प्रजाती नामशेष झाल्या तरी अनेक पक्ष्यांचे अस्तित्व पुरातन काळापासून आहे. ग्लाेबल वार्मिंगपासून ते वातावरण बदलाचे संकेत पक्ष्यांच्या हालचालीवरून समजते. त्यामुळे या पक्ष्यांचे, अधिवासाचे, जंगलांचे, तलावांचे संवर्धन हाेणे गरजेचे आहे, अशी भावना डाॅ. पिंपळापुरे यांनी व्यक्त केली.
इथनाे ऑर्निथाेलाॅजीवर वेबिनार आज
पक्षी आणि मानवामध्ये पुरातन काळापासून असलेल्या सहसंबंधावर प्रकाश टाकणाऱ्या महत्त्वपूर्ण वेबिनारचे आयाेजन महाराष्ट्र पक्षीमित्र संस्था तसेच बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री साेसायटी व सीईसी यांच्यावतीने साेमवारी करण्यात आले आहे. सायंकाळी ७ वाजता सुरू हाेणाऱ्या वेबिनारमध्ये डाॅ. अनिल पिंपळापुरे हे मार्गदर्शन करणार आहेत.