लाेकमत न्यूज नेटवर्क
काेराडी : महानिर्मितीच्या काेराडी (ता. कामठी) येथील वीज केंद्रातील अतिदक्षता विभागात काम करणाऱ्या ८० कंत्राटी कामगारांचे कंत्राट मुख्यालयाने अद्यापही नियमित केले नाही. कामाचे आदेश प्राप्त न झाल्याने त्यांना १५ जानेवारीपासून कामावरून तात्पुरते कमी केले आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर आर्थिक संकटांसाेबत उपासमारीची वेळ ओढवली आहे. कंत्राट नियमित करावे, या मागणीसाठी कंत्राटी कामगारांनी महादुल्याचे नगराध्यक्ष राजेश रंगारी यांच्या नेतृत्वात शुक्रवारी (दि. २२) काेराडी वीज केंद्राच्या प्रवेशद्वाराजवळ निदर्शने करीत आंदाेलन केले.
काेराडी वीज केंद्रातील अतिदक्षता विभागात कार्यरत असलेल्या ८० कंत्राटी कामगारांच्या कंत्राटाची मुदत महिनाभरापूर्वीच संपली आहे. त्यातच महानिर्मिती मुख्यालयाने संबंधित कंत्राटदाराला एक महिन्याची मुदतवाढ दिली आहे. या काळात महानिर्मिती व्यवस्थापनाने निविदा प्रक्रिया पूर्ण करणे अपेक्षित हाेते. ही प्रक्रिया पूर्ण न केल्याने कंत्राटदाराला कार्यादेश प्राप्त झाले नाहीत. त्यामुळे त्या कंत्राटदाराकडे काम करणाऱ्या ८० कंत्राटी कामगारांना कामावरून कमी करण्यात आले.
या आंदाेलनात राहुल नागदिवे, प्रशांत अडकिणे, विश्वनाथ चव्हाण, अजित गेडाम, बुलेश डहाके, नितीन तायडे, रूपेश चटप, मंगेश गिरजापुरे, बानाबाकोडे, बबलू नवधिंगे, नदीम शेख, प्रवीण घोडेस्वार, रोशन वाघमारे, योगेश सुरडकर, अमित शास्त्रकार, योगेश सावरकर, नीलेश केणेकर, अभिजित सोनेकर, विनोद मुसळे, हर्षल शेंडे, मनोहर ढेंगरे, हेमलाल मस्करे, सागर प्रधान, रमेश भोयर, किशोर मारोडकर यांच्यासह इतर कंत्राटी कामगार सहभागी झाले हाेते.
...
कामगारांच्या मागण्या
काम नसल्याने या कामगारांच्या कुटुंबीयांवर आर्थिक संकट काेसळले असून, त्यांच्यावर उपासमारीची वेळ ओढवली आहे. त्यामुळे महानिर्मिती व्यवस्थापनाने निविदा प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. संबंधित अथवा नवीन कंत्राटदाराला कार्यादेश द्यावे. त्या विभागात काम करणाऱ्या ८० कंत्राटी कामगारांना तत्काळ कामावर घ्यावे, आदी मागण्या कंत्राटी कामगारांनी वीज केंद्राच्या सुरक्षा अधिकाऱ्याकडे साेपविलेल्या निवेदनात केल्या आहेत. या कंत्राटी कामगारांच्या कार्यादेशाबाबत येत्या दाेन-तीन दिवसांत सकारात्मक निर्णय घेतला जाईल. त्यानंतर त्यांना कामावर बाेलावले जाईल, अशी माहिती वीज केंद्रातील अधिकाऱ्यांनी दिली.