लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अमरावती रोडवरील भरतवनच्या समोर रविवारी २०० हून अधिक नागरिकांनी रस्त्यावर झोपून निषेध आंदोलन केले. त्यात तरुण-तरुणींचा, ज्येष्ठांचा व मुलांचाही समावेश होता. हे आंदोलन राजकीय नव्हे तर निसर्गावर प्रेम करणाऱ्या सामान्य माणसांचे, भरतवन वाचविण्यासाठी सरसावलेल्या निसर्गप्रेमींचे होते. आरे कॉलनीच्या जंगलातील वृक्षतोड केली तसे भरतवनही भकास करणार काय, असा सवाल करीत प्रतिकात्मक निषेध करण्यात आला.आंदोलनात सहभागी झालेली एकही व्यक्ती कुठल्या राजकीय पक्ष, संस्था किंवा एनजीओशी संबंधित नव्हती. तिचा संबंध आहे तो हिरव्यागार पृथ्वीशी, या निसर्गाशी, जंगलांशी, पाण्याशी आणि श्वसनाला आवश्यक शुद्ध हवेशी. या नागरिकांनी भरतवन वाचविण्यासाठी हातात बॅनर, पोस्टर घेऊन तब्बल ३० मिनिटे मौनपणे झोपून पर्यावरण संवर्धनाचे आवाहन केले.सातत्याने हवामान बदल होत असल्याने भविष्यात मोठे संकट येणार आहे. त्यामुळे नियोजनाची जबाबदारी असलेल्यांनी लक्षात घ्यावे, तुम्ही पर्यावरण वाचवू शकत नाही, पर्यावरण तुमच्या अजेंड्यावर नसेल तर तुम्ही जनतेचे प्रतिनिधी होऊ शकत नाही, अशी टीका आंदोलकांनी केली. नागपूर शहराची हिरवळ सातत्याने कमी होत आहे. शहरातील तलाव प्रदूषित झाले असून हवा सुद्धा प्रदूषित होत आहे. त्यामुळे वृक्षांचे जतन ही काळाची गरज आहे. अशावेळी भरतवनसारखे जंगल संरक्षित व संवर्धित करणे आवश्यक आहे. आम्ही कुठल्याही परिस्थितीत आरे सारखी स्थिती भरतवनमध्ये होऊ देणार नाही, असा इशारा विधानसभा निवडणुकीपूर्वी या निसर्गप्रेमींनी दिला.यावेळी पर्यावरण संवर्धन प्रत्येकाची जबाबदारी आहे ही जाणीव करून देणारी प्रतिज्ञा घेण्यात आली. प्रशासनालाही इशारा देत निसर्गाशी खेळ करू नका, असे आवाहन केले. ‘फ्रायडे फॉर फ्युचर’ग्रुपचे तरुणही यामध्ये सहभागी होते.
२०० हून अधिक नागरिकांचे रस्त्यावर झोपून आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 10:37 AM
अमरावती रोडवरील भरतवनच्या समोर रविवारी २०० हून अधिक नागरिकांनी रस्त्यावर झोपून निषेध आंदोलन केले.
ठळक मुद्देआबालवृद्ध, तरुणांचा समावेशअनोख्या आंदोलनाने वेधले लक्ष