- कृषी कायद्याच्या विरोधात भारत बंद : केंद्र सरकारविरुद्ध नारेबाजी
नागपूर : कामठी रोडवर ऑटोमोटिव्ह चौकात केंद्र सरकारच्या कृषी कायद्याच्या विरोधात व्यापारी, शेतकरी, युवक, महिला आणि हजारो लोकांनी आंदोलन आणि नारेबाजी केली. गुरुद्वारा कमिटी व नागपूर ट्रकर्स युनिटतर्फे असोसिएशनचे अध्यक्ष कुक्कू मारवाह, दिलीप सिंग ढिल्लों, महाराट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव अतुल कोटेचा, काँग्रेस नेते नरेंद्र जिचकार, युवा नेता कुणाल राऊत, महामंत्री रिंकू जैन, टोनी जग्गी उपस्थित होते.
कुक्कू मारवाह म्हणाले, राज्य मजबूत होईल तेव्हाच देश मजबूत होणार आहे. देशाच्या व्यवस्थेचे केंद्रीयकरण करण्यात येत आहे. राज्यांना अधिकाराचे रक्षण करण्याची गरज आहे. नोटाबंदी, जीएसटी, कृषी बिलाने अर्थव्यवस्था मंदीत आली आहे. अतुल कोटेचा म्हणाले, शेतकऱ्यांचे आंदोलन देशात कानाकोपऱ्यात सुरू असून, त्यामुळे सरकारची पोलखोल होत आहे. मोदी सरकार पेट्रोल आणि डिझेलची किंमत वाढवीत आहे. युवकांच्या रोजगाराचा प्रश्न गंभीर आहे. पोलीस शेतकऱ्यांवर लाठीचार्ज करीत आहेत. हे चुकीचे आहे. याप्रसंगी मालकियत सिंग बल, निशांतसिंग गोत्रा, गुरदयालसिंग पड्डा, टोनी जग्गी, ओंकारसिंग बेण्स, खुश्कवलसिंग आनंद, गुल्लू ढिल्लन, हनी भंडारी, असलम मुल्ला आदींसह लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.