नागपूर : पदभरती, पदोन्नती, कोविडभत्ता, रजा आणि इतर अन्य प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील सर्वच शासकीय रुग्णालयांमधील परिचारिका उद्या, २१ जूनपासून आंदोलन करणार आहेत. सुरुवातीचे दोन दिवस दोन तास तर, नंतरचे दोन दिवस पूर्ण दिवस कामबंद केले जाणार आहे. या दरम्यान मागण्या मान्य झाल्या नाही तर, २५ जूनपासून बेमुदत आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने दिला आहे.
राज्यातील सर्वच शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या तुलनेत परिचारिकांची संख्या फार कमी आहे. यामुळे परिचारिकांवर कामाचा ताण पडला आहे. वेळेवर रिक्त पदे न भरल्यामुळे व वेळोवेळी परिचारिकांची संख्या न वाढविल्यामुळे ही समस्या निर्माण झाल्याचे नागपूर संघटनेचे उपाध्यक्ष शहजाद बाबा खान यांनी सांगितले. ते म्हणाले, सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सोमवार व मंगळवारी दोन तास कामबंद आंदोलन केले जाईल, बुधवार व गुरुवारी संपूर्ण दिवस कामबंद ठेवले जाईल. त्यानंतरही शासन मागण्यांच्याप्रति उदासीन असेल तर नाईलाजाने बेमुदत आंदोलन केले जाईल.
-या आहेत मागण्या
:: १०० टक्के पदभरती व १०० टक्के पदोन्नती
:: केंद्र शासनाप्रमाणे नर्सिंग भत्ता
:: कोव्हीड काळात ७ दिवस कर्तव्यकाळ व ३ दिवस अलगीकरण रजा
:: अर्जित रजा शिल्लक ठेवण्याची व पुन्हा उपभोगण्याची परवानगी
:: केंद्र शासनाप्रमाणे पदनामामध्ये बदल करावा
:: नियमबाह्य निलंबन व कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी
:: सार्वजनिक आरोग्य विभागातील सेवा प्रवेश नियमात बदल करावा
:: कोरोनामुळे रुग्णालयात भरती होणाऱ्यांना विशेष रजा द्यावी
:: परिचारिकांना केवळ रुग्णसेवेचेच काम द्यावे
:: मृत परिचारिकांच्या कुटुंबीयांना ५० लाखांचा विमा लाभ द्यावा
:: २००५नंतर रुजू झालेल्या परिचारिकांना जुनी पेन्शन लागू करावी
:: सातव्या वेतन आयोगाचा दुसरा व तिसरा हप्ता त्वरित देण्यात यावा