हिंगणा : राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत सुरू असलेल्या कामात कंत्राटदार दिरंगाई करीत आहे. पाईपलाईन टाकताना खोदलेले रस्ते दुरुस्ती व खड्डे बुजविण्यासाठी चालढकल करीत असल्याचा आरोप करीत डिगडोहच्या सरपंचासह पदाधिकाऱ्यांनी मंगळवारपासून बालाजीनगर चौकात धरणे आंदोलन सुरू केले आहे. याप्रकरणी दोषी कंत्राटदारावर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या मुख्य अभियंत्यांनी कारवाई करावी, अशी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची मागणी आहे. डिगडोह व नीलडोह येथे राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत ४४ कोटींच्या नवीन नळ योजनेचे काम सुरू आहे. टाकीचे काम झाल्यानंतर शेवटच्या टप्प्यात नवीन पाईपलाईन टाकणे सुरू असताना डिगडोह येथील सहाही वॉर्डात जेसीबीने पक्के सिमेंट रस्ते तोडण्यात आले, तर काही ठिकाणी सांडपाण्याच्या नाल्या तोडून पाईपलाईन टाकण्यात आली. पाईपलाईन टाकल्यानंतर त्या रस्त्याची दुरुस्ती करणे हे कंत्राटदाराचे काम आहे. मात्र पाईपलाईनच्या नाल्या थातूरमातूर बुजवून कंत्राटदाराने काम संपविण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक ठिकाणी उरलेली माती रस्त्यावर पडून आहे. काही ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात याचा त्रास परिसरातील नागरिकांना होत आहे. कंत्राटदार ग्रामपंचायतमधील पदाधिकाऱ्यांचे याबाबत ऐकून घेण्यास तयार नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने याची दखल घ्यावी, अशी मागणी सरपंच इंद्रायणी काळबांडे, उपसरपंच कैलाश गिरी, ग्रामपंचायत सदस्य विनोद ठाकरे, बंडू भोंडे, प्रदीप इंगोले, राजेश बोरकर, हेमंत देशमुख, ज्ञानेश्वर कोकुडे, प्रिया वासनिक, सीमा शर्मा, मीना वानखेडे, रश्मी साबळे, ज्योती कथलकर, प्रजेश तिवारी, लता पांडे यांनी केली आहे. सुचिता ठाकरे, माजी पं.स. सदस्य सुरेश काळबांडे, माजी सरपंच चेतनलाल पांडे, बाळासाहेब वाघमारे, महेश लोखंडे, शार्दुल कथलकर, राकेश उमाळे, विनायक गाडे, राकेश यादव यांनीही धरणे मंडपाला भेट दिली.
कंत्राटदाराविरोधात सरपंचासह पदाधिकाऱ्यांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 4:12 AM