लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दिल्लीच्या डॉ. आंबेडकर फाऊंडेशनच्या धर्तीवर महाराष्ट्रातही डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली. आंबेडकरी चळवळीचे केंद्र व जगाला समतेचा संदेश देणारी ऊर्जाभूमी म्हणून प्रसिद्ध असलेली दीक्षाभूमी असलेल्या नागपुरात या प्रतिष्ठानचे मुख्यालय उघडण्यात आले. सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत असलेल्या या प्रतिष्ठानचे मुख्यालय मंत्री बदलताच मुंबईला हलवण्याची तयारी सुरू झाल्याची माहिती आहे.समता प्रतिष्ठानचा मुख्य हेतू समाजात भारतीय संविधानाला अपेक्षित समता प्रस्थापित करणे आहे. प्रतिष्ठानतर्फे समाजातील सर्वच दुर्बल घटकांना तसेच शैक्षणिक व सामाजिक दृष्ट्या मागासलेल्या प्रदेशातील जनतेला उच्च दर्जाचे शिक्षण व व्यावसायिक प्रशिक्षण मिळावे, समताधिष्ठित मूल्य जनमानसात रुजविण्याच्या उद्देशाने वाचनालय, अभ्यास कक्ष, संशोधन संस्था, शैक्षणिक केंद्रे इत्यादींची स्थापना करणे, तसेच विविध दुर्बल समाज घटकांच्या उन्नतीसाठी कार्यात्मक येजना तयार करून त्याची अंमलबजावणी करणे याशिवाय दुर्बल घटकांसाठी अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात. या प्रतिष्ठानची स्थापना १० जुलै २०१७ रोजी कंपनी कायदा २०१३ च्या अनुच्छेद ८ अंतर्गत कुठलाही नफा न कमविण्याच्या तत्त्वावर करण्यात आली. सध्या प्रतिष्ठानचे कार्यालय हे सामाजिक न्याय भवनाच्या इमारतीमध्ये आहे. परंतु उत्तर नागपुरात उभारण्यात येत असलेल्या डॉ. आंबेडकर कन्वेंशन सेंटरच्या भव्य इमारतीमध्ये प्रतिष्ठानचे कार्यालय लवकरच सुरू होणार आहे. यासाठी तत्कालीन सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी बरेच परिश्रम घेतले आहे. प्रतिष्ठानतर्फे अनेक सामाजिक उपक्रमही राबवले जात आहेत.मिळालेल्या माहितीनुसार सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे हे समता प्रतिष्ठान मुंबईला हलविण्याच्या तयारीत आहेत. पुणे येथे हलवण्याचीही चाचपणी केली जात आहे. मंत्र्यांच्या कामासाठी सोयीचे ठरावे म्हणून समता प्रतिष्ठान मुंबईला हलवण्यात येणार असल्याचे सांगितले जाते. परंतु हे महत्त्वाचे कार्यालय नागपुरातून हलवणे म्हणजे नागपूरचे महत्त्व कमी करण्यासारखेच होय. स्वत: मुख्यमंत्री याबाबत काय निर्णय घेतात यकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुख्य उद्देशालाच धक्का दिल्ली येथील डॉ. आंबेडकर फाऊंडेशनच्या धर्तीवर जेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान स्थापन करण्यात आले. तेव्हा याच्या मुख्यालयासाठी केवळ नागपूर शहराचेच नाव निश्चित करण्यात आले होते. नागपुरातील दीक्षाभूमी ही जगाला समतेचा संदेश देणारी ऊर्जाभूमी म्हणून जगभर प्रसिद्ध आहे. म्हणूनच समता प्रतिष्ठानचे मुख्यालय हे नागपूर या परिवर्तन स्थळीच करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. पुरोगामी विचाराने प्रेरित या मातीतूनच प्रबोधनाचा संदेश जगभर पोहचावा, अशी महाराष्ट्र शासनाची भूमिका असल्याचे संगण्यात आले होते. तेव्हा हे कार्यालय नागपुरातून हलवण्यात आल्यास याच्या मूळ उद्देशालाच धक्का लावल्यासारखे होईल.