- शत्रुघ्न सिन्हा : महिला पत्रकारांचा सत्कार सोहळा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अनेक वर्षांपासून महिलांना सक्षम बनविण्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यादृष्टीने कार्य केलेही जात आहे. मात्र, आजही महिलांचे शोषण होत आहे, हे नाकारता येत नाही. समाजाच्या आरोग्यासाठी महिलांचे शोषण, ही कधीच चांगली बाब नव्हती आणि नाही. महिला समाजाचा कणा आहेत आणि त्यांच्याच आधारावर समाज चालतो आहे. मुलींना वाचवा, मुलींना शिकवा, हा जगाचा नारा आहे. परंतु, भारतात या अभियानाची सुरुवात उशिराने सुरू झाल्याची भावना प्रसिद्ध अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांनी व्यक्त केली.
नागपूर श्रमिक पत्रकार संघ, टिळक पत्रकार भवन ट्रस्ट व प्रेस क्लब ऑफ नागपूरच्या वतीने आयोजित जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
सिव्हिल लाईन्स येथील प्रेस क्लबमध्ये आयोजित या कार्यक्रमात प्रारंभी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिचा लघुपट प्रदर्शित करण्यात आला. महिलांनी दबंग बनण्याचे आवाहन यात करण्यात आले. यावेळी केंद्रीय चित्रपट प्रमाणन बोर्डाचे माजी अध्यक्ष, चित्रपट निर्माता, दिग्दर्शक पहलाज निहलानी, ज्येष्ठ पत्रकार एस. एन. विनोद, ज्येष्ठ पत्रकार सर्वमित्रा सुरजन, मुख्य आयुकर आयुक्त रुबी श्रीवास्तव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
आजच्या घडीला सर्वात उत्तम काम कुणी करत असतील तर त्या महिला आहेत. महिलांना सक्षम बनविण्यासाठी कोणत्याही अभियानासाठी मी तत्पर असल्याचे शत्रुघ्न सिन्हा यावेळी म्हणाले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार सरिता कौशिक यांना शोभा विनोद स्मृती वूमन जर्नालिस्ट ऑफ दी इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यासोबतच अन्य महिला पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. प्रास्ताविक प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीप मैत्र यांनी केले. संचालन वर्षा बासू यांनी केले तर आभार जोसेफ राव यांनी मानले.
---------
सत्कारमूर्ती
- रुबी श्रीवास्तव, मुख्य आयकर आयुक्त
- सर्वमित्रा सुरजन, ज्येष्ठ पत्रकार
- मेघना देशपांडे, पत्रकार
- कल्पना नळस्कर, पत्रकार
- उषा मिश्रा, सामाजिक कार्यकर्त्या
- मीनाक्षी हेडाऊ, पत्रकार
- डॉ. सीमा पांडे, पत्रकार
...................