नागपूर : महापालिकेतील कोट्यवधीच्या स्टेशनरी व प्रिंटर घोटाळ्यात कंत्राटदारांसह बड्या अधिकाऱ्यांचा समावेश असल्याने राजकीय वादळ उठले आहे. चौकशीतून सत्ताधाऱ्यांच्या निकटवर्तींयाचा फास आवळा जाणार असल्याने हा घोटाळा दडपण्यासाठी पडद्याआड जोरदार हालचाली सुरू आहेत. यासाठी दबाव तंत्राचा वापर केला जात आहे.
स्थायी समितीच्या बैठकीतील ठरावानुसार स्टेशनरी घोटाळा अधिकारी व कर्मचारी यांच्यामुळे झाला आहे. प्रथम दर्शनी प्रमुख लेखा व वित्त अधिकारी संजय कोल्हे व सामान्य प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त महेश धामेचा यांच्यासह वित्त विभागातील लेखाधिकारी दोषी आढळून येत आहेत. महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम १९७९ अन्वये विभागीय चौकशी सुरू करण्यात यावी. संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी पूर्ण होईपर्यत त्यांना तातडीने निलंबित करण्यात यावे, असे निर्देश समितीने प्रशासनाला दिले.
मनपा अधिनियमाचे कलम २४ चे पोटकलम २ अन्वये घोटाळा प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उपसमिती गठित करण्यात आली. एक महिन्यात समितीने चौकशी अहवाल स्थायी समितीला सादर करावा. अशा आशयाचा प्रस्ताव समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आल्याची महिती आहे. मात्र, या निर्णयामुळे पदाधिकारी व प्रशासनात एकच खळबळ उडाली. समितीचा हा निर्णय फिरवण्यासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या. दबावाचा वापर केला जात असल्याचे दिसून येते. मनपातील घडामोडी विचारात घेता स्थायी समितीने गठित केलेली चौकशी समिती ही नावापुरतीच राहणार आहे.
प्रोसिडिंगमधून निलंबनाचा मुद्दा वगळण्यासाठी दबाव
स्थायी समितीच्या बैठकीत दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचा प्रस्ताव होता. बड्या नेत्यांच्या व पदाधिकाऱ्यांच्या दबावामुळे हा मुद्दा प्रोसिडिंगमधून वगळण्यासाठी हालचाली सुरू आहे. घोटाळा दडपण्यासाठीच हा खटाटोप सुरू असल्याची मनपात चर्चा जोरदार आहे.
...तर समिती कशी करणार चौकशी?
घोटाळ्यात सकृत दर्शनी दोषी बडे अधिकारी पदावर कायम असताना स्थायी समितीने नियुक्त केलेली उपसमिती या प्रकरणाची चौकशी कशी करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. याच अधिकाऱ्यांचा पासवर्ड व आयडी वापरून हा घोटाळा झाल्याचे निदर्शनास आले आहे. समितीला अशा परिस्थितीत समिती मागील पाच वर्षांतील व्यवहाराची माहिती अधिकारी देतील का, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
मागणी करूनही विशेष सभा नाही
स्टेशनरी व प्रिंटर घोटाळ्याची व्याप्ती मोठी आहे. प्रसार माध्यमातून याबाबतचे वृत्त प्रकाशित होत असल्याने यात मनपाची प्रतिमा मलिन होत आहे. याचा विचार यावर चर्चा करण्यासाठी तातडीने विशेष सभा घेण्याची मागणी विरोधी पक्षनेते तानाजी वनवे व नगरसेविका आभा पांडे यांनी महापौरांकडे केली आहे. मात्र, अद्याप यावर निर्णय झालेला नाही.