लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पुढील वर्षात मनपा निवडणूक आहे. याचा विचार करता, स्थायी समितीचा नवा अध्यक्ष निवडण्यासाठी भाजपात हालचाली सुरू झाल्या आहेत. विद्यमान अध्यक्ष विजय झलके यांचा कार्यकाळ १ मार्चला संपत आहे. याचा विचार करता, १८ फेब्रुवारीला होणाऱ्या सर्वसाधारण सभेत नवीन अध्यक्षांची घोषणा केली जाणार आहे. असे असले तरी अद्याप अध्यक्षांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली नाही.
मागील दीड वर्षापासून मनपाच्या विकास कामांना ब्रेक लागला आहे. मनपाकडे जवळपास ५०० कोटींची देणी आहे. ही देणी देण्यात प्रशासनाला अपयश आले आहे. विद्यमान अध्यक्षांच्या कार्यकाळ कोरोनातच गेला. त्यांनी सादर केलेला अर्थसंकल्प आयुक्तांनी मंजूर केला. परंतु त्यांची अंमलबजावणी झाली नाही. याचा विचार करता, नवीन अध्यक्षांपुढे मोठे आव्हान राहणार आहे. दुसरीकडे ७ ते ८ महिन्यांचाच कालावधी मिळणार आहे. याचा विचार करता, नवीन अध्यक्षांकडून नगरसेकांना मोठ्या अपेक्षा राहणार आहे. दुसरीकडे मनपाची आर्थिक स्थिती बिकट असल्याने परिस्थितीत फारसा बदल होण्याची शक्यता दिसत नाही.
चार वर्षांत पहिल्या वर्षात पश्चिम नागपुरात संदीप जाधव, दुसऱ्या वर्षात उत्तर नागपुरातील वीरेंद्र कुकरेजा, तिसऱ्या वर्षात पूर्व नागपुरातील प्रदीप पोहाणे अध्यक्ष होते. विद्यमान अध्यक्ष विजय झलके हे दक्षिण नागपुरातील आहेत. दक्षिण-पश्चिम नागपुरातील नंदा जिचकार अडीच वर्ष महापौर होत्या. १३ महिने संदीप जोशी महापौर होते. विद्यमान महापौर दयाशंकर तिवारी मध्य नागपुरातील आहेत. परंतु त्यांना ८ महिन्यांचाच कार्यकाळ मिळणार आहे. याचा विचार करता, याच भागातील स्थायी समिती अध्यक्ष निवडला जाण्याची शक्यता आहे. तसेच मध्य नागपुरात भाजपचे वजनदार नेते आहेत.
पदवीधर निवडणुकीत दक्षिण-पश्चिमला संदीप जोशी यांच्या स्वरुपात महत्त्व देण्यात आल्याने या भागातील अन्य नगरसेवकांना संधी मिळाली नाही, असे भाजप नगरसेवकांचे म्हणणे आहे.
....
हे होतील निवृत्त
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमच्या कलम २० (३) अंतर्गत स्थायी समितीचे ८ सदस्य दरवर्षी १ मार्चला निवृत्त होतात. त्यानुसार १ मार्चला भाजपचे प्रदीप पोहाणे, यशश्री नंदनवार, विक्रम ग्वालबंशी, वंदना भगत, संजय चावर, काँग्रेसचे दिनेश यादव, गार्गी चोपडा व बसपचे इब्राहिम तौफिक अहमद निवृत्त होत असून, त्यांची जागा नवीन सदस्य घेतील.