कुख्यात गुन्हेगारही चौकशीच्या फेऱ्यात : गुन्हे शाखेतील हालचाली तीव्र नागपूर : तीन आठवड्यांपूर्वी अग्रसेन चौकाजवळ झालेल्या एकनाथराव निमगडे हत्याकांडात गुन्हे शाखेतर्फे एका कुख्यात गुन्हेगाराची अन् चित्रपट वितरकाची (फिल्म डिस्ट्रीब्युटर) पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. या चित्रपट वितरकाचे शहरातील काही भूमाफिया आणि हत्याकांडातील आरोपीशीही संबंध असल्याचे बोलले जाते. तीन दिवसांपासून सुरू असलेल्या या घटनाक्रमामुळे संबंधित वर्तुळात नव्याने खळबळ उडाली आहे. ६ सप्टेंबरला मॉर्निंग वॉक करून घराकडे निघालेले ज्येष्ठ आर्किटेक्ट एकनाथराव निमगडे (वय ७२) यांच्यावर एका अॅक्टीव्हा स्वाराने माऊझरमधून अंदाधुंद गोळ्या झाडून त्यांची हत्या केली होती. या थरारक हत्याकांडातील आरोपींचा छडा लावण्यासाठी गुन्हेशाखेचे पथक गेल्या १७ दिवसांपासून रात्रंदिवस धावपळ करीत आहे. मात्र, आरोपींविरुद्ध कसलाही ठोस पुरावा पोलिसांना मिळाला नाही. त्यामुळे यापूर्वीचे काही हत्याकांड आणि जमिनीच्या वादाशी जुळलेल्या भूमाफियांची पोलिसांनी जंत्री उघडली आहे. निमगडेशी वाद असलेल्या संशयितांचेही रेकॉर्ड तपासले जात आहे. त्यातून या चित्रपट वितरकाचा आणि त्याच्याशी घनिष्ट संबंध असलेल्या एका भूमाफियाचे नाव पुढे आले. तीन वर्षांपूर्वी उपराजधानीत गणेश मते हत्याकांडाने खळबळ उडवली होती. जमिनीच्या वादातून ही हत्या घडली होती.धक्कादायक बाब उघड नागपूर : पोलिसांनी या प्रकरणाशी संबंधित आरोपींवर नजर रोखली. त्या आरोपीचे आणि या हत्याकांडात सुरुवातीपासूनच संशयाच्या भोवऱ्यात असलेल्याचे धागे जुळल्यामुळे पोलिसांच्या चेहऱ्यावरची चमक वाढली आहे. त्यांनी गोपनीय चौकशी केली असता हत्याकांडातील आरोपी आणि कथित चित्रपट वितरकाचे एकमेकांशी सख्य असल्याचेही पुढे आले. हे दोघेही जमिनीच्या अनेक (दुसऱ्या) व्यवहारांशी जुळल्याचे पुढे आल्यामुळे प्रारंभी गुन्हेगार आणि त्यानंतर या चित्रपट वितरकाला पोलिसांनी चौकशीसाठी बोलविले. तीन दिवसांपासून त्याची चौकशी केली जात आहे. वर्धा मार्गावरील सोमलवाड्यातील १०० ते १५० कोटींच्या जमिनीच्या वादातून हत्याकांड घडवून आणल्याचा पोलिसांचा संशय आहे. स्थानिक पोलिसांच्या रेकॉर्डवर नसलेल्या सुपारी किलरकडून निमगडेंचा गेम करवून घेण्यात आल्याचेही त्यामुळेच सर्वत्र बोलले जाते. निमगडेच्या हत्येची सुपारी देऊन थंड डोक्याने हे हत्याकांड घडवून आणण्यात आल्याचे आणि या प्रकरणात कुणीतरी मोठा गुंतला असावा, असाही संशय असल्यामुळे पोलीस अत्यंत सावधगिरीने तपास करीत आहेत. अशाच सावधगिरीतून गुन्हेगार आणि कथित चित्रपट वितरकाचीही तीन दिवसांपासून अत्यंत गोपनीय पद्धतीने चौकशी केली जात आहे. या चौकशीत एक धक्कादायक बाब उघड झाली, ती म्हणजे, निमगडेंच्या जमिनीची कागदपत्रे पोलिसांना या वितरकाकडे आढळली आहे. त्यामुळे पोलिसांनी गुरुवारी रात्री त्याचे सविस्तर बयान रेकॉर्ड केले. या पार्श्वभूमीवर, या प्रकरणात काही दिवसात धक्कादायक खुलासा होण्याचे संकेत मिळाले आहे. या संदर्भात गुन्हेशाखेसह सर्वच पोलीस अधिकारी कमालीची गोपनीयता बाळगत आहेत, हे विशेष !(प्रतिनिधी)
निमगडे हत्याकांडात चित्रपट वितरकाची चौकशी
By admin | Published: September 24, 2016 1:03 AM