लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गुन्हे शाखेच्या एनडीपीएस सेलने गांजा तस्करीमध्ये लिप्त असलेले उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेश येथील टाेळीला गजाआड टाकले आहे. पाेलिसांनी चार आराेपींना अटक करून त्यांच्याजवळून ९८ किलाे गांजासह २७ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
कळमनास्थित भरतवाडा परिसरात कुख्यात गुन्हेगार नरेश ऊर्फ पप्पू श्रीवास्तव हा बऱ्याच काळापासून गांजाची तस्करी करीत हाेता. स्थानिक व बाहेरील गांजा तस्करांना मालाचा पुरवठा करीत हाेता. ७ जूनच्या रात्री सोहेल खान शमीम खान (२२), सुनील बसंत मालवी (३१) रा. छिंदवाडा हे एमपी-२८, सीए-२३८७ या क्रमांकाच्या कारने पप्पूकडून गांजा घेऊन छिंदवाड्याला जात हाेते. याची गुप्त माहिती एनडीपीएस सेलला मिळाली. या पथकाने पाळत ठेवून मानकापूरच्या फरस भागात कारला थांबविले. गाडीची झडती घेतल्यानंतर त्यामध्ये ३५ किलाे ३९० ग्रॅम गांजा आढळून आला. पाेलिसांनी चाैकशी केली असता साेहेल व सुनीलने पप्पूकडूनच गांजा घेतल्याचे सांगितले. पाेलिसांनी पप्पूच्या घरी दबा दिला. ताे फरार झाला हाेता. पाेलिसांनी गांजा व कारसह १२.५० लाखांचा माल ताब्यात घेतला. पप्पू बऱ्याच वर्षापासून गांजा तस्करी करीत आहे. या कामात त्याच्या कुटुंबीयांकडूनही मदत हाेते. त्याचा कळमना येथे पानठेला आहे व तिथूनच ताे गांजाची विक्री करताे. पकडलेले आराेपीसुद्धा त्याच्याशी जुळले असून त्यांनी अनेकदा पप्पूकडून गांजा खरेदी केला आहे.
या कारवाईप्रमाणेच विशाखापट्टणम येथून उत्तरप्रदेशच्या नाेएडा येथे गांजा नेला जात असल्याची माहिती एनडीपीएस सेलला मिळाली. पाेलिसांनी यूपी-७६, एम-३०७१ या क्रमांकाच्या गाडीला थांबविले. गाडीमध्ये अजितसिंह राकेशसिंह (२९, रा. नाेएडा) व दिलीपकुमार शाह रामबहादूर शाहा (३५, रा. सहरसा, बिहार) हे प्रवास करीत हाेते. कारची झडती घेतली असता त्यामध्ये दाेन पाेत्यांमध्ये ६२ किलाे ५९८ ग्रॅम गांजा असल्याचे आढळून आले. पाेलिसांनी कार व गांजासह १४.४९ लाख रुपयांचा माल जप्त केला. आराेपींना ११ जूनपर्यंत पाेलीस काेठडीत ठेवण्यात येणार आहे. डीसीपी गजानन राजमाने यांच्या मार्गदर्शनात पीआय विशाल काळे व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.