नागपूर : कलावंतांची वारी... मग ती संगीताची असो, अभिनयाची असो वा महाराष्ट्राच्या हास्यजत्रेची का असेना नागपुरात आली अन् नागपूरच्या अर्विभावात मिसळणार नाही, असे शक्यच नाही. शुक्रवारी नागपुरात आलेल्या महाराष्ट्राच्या हास्यजत्रेतही हाच अनुभव आला आणि या जत्रेतून एकापेक्षा एक विनोदी चौकार, षट्कारासह नागपुरी बोलीभाषेचा वापर झक्कासतेने करण्यात आला. त्यातील एक म्हणजे निवडणूक प्रसंगात वापरलेला संवाद होता.. मसाल्यात मसाले सावजी, जिंकणार फक्त आमचे भाऊजी.
क्रीडा चौक, हनुमाननगर येथील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणात सुरू असलेल्या चौथ्या खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या आठव्या दिवशी व्यासपीठावर महाराष्ट्राची हास्यजत्रा पोहोचली होती. त्यात प्रसाद ओक, प्राजक्ता माळी यांच्यासह सुपरहॉट सई ताम्हणकर यांच्या निवेदनात हास्यकलाकार समीर चौगुले, अरुण कदम, विशाखा सुभेदार, गौरव मोरे, प्रसाद खांडेकर, नम्रता आवटे, ओंकार भोजने, वनिता खरात यांच्या चमूने नागपूरकरांना विविध नाट्यछटांच्या माध्यमातून लोटपोट करून सोडले.
दरम्यान, हिंदवी स्वराज्याची धुरा सांभाळणारी स्वराज्य सौदामिनी ताराराणी मंचावर अवतरली. 'स्त्री म्हणजे चुलीचा कारभार नव्हे, ती पेटली तर दिल्लीचा कारभार उद्ध्वस्त करू शकते' असे म्हणत ताराराणीने 'हर हर महादेव' चा गजर केला. तिच्या सुरात रसिकांनीही सूर मिसळला. ‘अजूनी बरसात आहे’ या मालिकेती मीरा व आदिराज अर्थात मुक्ता बर्वे व उमेश कामत हे यावेळी प्रेक्षकांच्या भेटीला आले होते.
यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह प्रसिद्ध होमियोपॅथ डॉ. विलास डांगरे, प्रांत संघचालक राम हरकरे, महानगर संघचालक राजेश लोया, उपायुक्त पखाले, कांचन गडकरी, ज्येष्ठ पत्रकार देवेंद्र गावंडे, गजानन निमदेव, संदीप भारंबे, संजय गुप्ता, दिपेन अग्रवाल, सत्ता पक्ष नेते अविनाश ठाकरे, खासदार सांस्कृतिक महोत्सव आयोजन समितीचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले, उपाध्यक्ष मधूप पांडे, गौरीशंकर पाराशर, अशोक मानकर, दिलीप जाधव, सचिव जयप्रकाश गुप्ता, कोषाध्यक्ष प्रा. राजेश बागडी, हाजी अब्दुल कादिर, संजय गुलकरी, संदीप गवई, चेतन कायरकर, आशिष वांदिले, भोलानाथ सहारे, रेणुका देशकर उपस्थित होते.
नागपूरकर कलावंतांचाही सहभाग
महाराष्ट्राच्या हास्यजत्रेत इंडियन आयडॉल मराठीमध्ये स्पर्धक असलेला नागपूरकर कैवल्य केसकर, भाग्यश्री टिकले, जगदीश चव्हा या गायकांनी आपल्या स्वरांची जादू रसिकांवर पसरली. नागपूरकर ज्येष्ठ अभिनेते राजेश चिटणीस हेही या हास्यजत्रेत सहभागी झाले होते.
.............