लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपुरात २९ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या तिसऱ्या खासदार सांस्कृतिक महोत्सवाचा आता उत्तरार्ध सुरू झालेला असून, शुक्रवारी महोत्सवात रामकृष्ण मठ, पुणे प्रस्तुत ‘युगनायक विवेकानंद’ हे नृत्य-संगीतमय चरित्रनाट्य सादर झाले. स्वामी विवेकानंदांच्या जन्मापूर्वीचा आणि जन्मापासूनचा भारत, इंग्रजांनी केलेले येथील संस्कृतीवरील आक्रमण, झोपलेल्या भारतीयांना ‘सिंहा जागा हो’ असे केलेले आवाहन, आदी घडामोडींचा प्रवास या नाट्यातून नागपूरकरांना झाला.क्रीडा चौक येथील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणावर शुक्रवारी स्वामी श्रीकांतानंद लिखित ‘युगनायक विवेकानंद’ हे महानाट्य सादर झाले. संगीत दिग्दर्शन केदार पंडित, कार्यकारी दिग्दर्शक व संहिता संकलक नचिकेत जोग, नृत्य दिग्दर्शिका अमीरा पाटणकर व मधुरा आफळे यांचे होते. श्यामराज पाटील, सुधांशु पानसे, महादेव हेरवाडकर, सयाजी शेंडकर, श्रीराम गोखले, निरंजन कुलकर्णी, रामेश्वरी वैशंपायन, मीनल देशपांडे, लक्ष्मीकांत पवार यांच्या भूमिका होत्या.भारतीय संस्कृतीची महत्ता सर्वोच्च असल्याचे शिकागो येथील धर्मसभेत सिद्ध करून दाखवणारे, भारतीयांच्या मनात स्वधर्म आणि स्वसंस्कृतीची नवचेतना प्रज्वलित करण्याचे कार्य करणाºया स्वामी विवेकानंदांची तेजस्वी गाथा सुरेख सादर झाली. स्वामी विवेकानदांचे बालपण ते शिकागोमधील त्यांच्या भाषणापर्यंतचा जीवनप्रवास विविध प्रसंग, नृत्य, नाट्य आणि निवेदनातून सादर करत हे नाटक प्रेरणादायी ठरले. नरेंद्रच्या आयुष्यात रामकृष्ण परमहंस यांचे आगमन झाले आणि त्यांचा कायापालट झाला. कालिमातेचे पूजन करणारे रामकृष्ण परमहंस यांनी त्यांच्यात आध्यात्मिक उन्नती घडवून आणली. हे घटनाक्रम सादर करताना गीत, संगीत आणि नृत्याचे समन्वयन सुरेख होते.स्वामीजींच्या पदरेणूने पावन भारत माता, धर्मश्रद्धा लोप पावली नास्तिकता आली जना धाव हे करुणाकरा, शिवा कृपा करी आता, शिवंपुत्रं आले होऊनं विवेकानंद नाम केले धारणं, गुरूचे चरण धरा अशी गाणी व त्यावरी प्रसंग नृत्य आकर्षक ठरले. तत्पूर्वी एम्सच्या संचालिका डॉ. विभा दत्त, रामकृष्ण मठ पुणेचे स्वामी मंत्रानंद, ज्येष्ठ पत्रकार देवेंद्र गावंडे, मणिकांत सोनी, भाजपा शहराध्यक्ष प्रवीण दटके, डॉ. गिरीश गांधी, उद्योगपती बी.सी. भरतिया, आ. अनिल सोले, बाळ कुळकर्णी, राजेश बागडी, जयप्रकाश गुप्ता यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. छाया वानखेडे यांनी गायलेल्या ‘भारत हमारी माँ है, माता का रूपं प्यार, करना इसी की रक्षा, कर्तव्य है हमारा’ या प्रेरणा गीताने कार्यक्रमास सुरुवात झाली.
खासदार सांस्कृतिक महोत्सव :शिवंपुत्र आले होऊन, विवेकानंद नाम केले धारण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 1:01 AM
नागपुरात २९ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या तिसऱ्या खासदार सांस्कृतिक महोत्सवाचा आता उत्तरार्ध सुरू झालेला असून, शुक्रवारी महोत्सवात रामकृष्ण मठ, पुणे प्रस्तुत ‘युगनायक विवेकानंद’ हे नृत्य-संगीतमय चरित्रनाट्य सादर झाले.
ठळक मुद्देयुगनायक विवेकानंद : संगीत-नृत्यनाटिकेतून उलगडले स्वामी चिंतन