नागपूर : खासदार नवनीत राणा यांचे जातीचे प्रमाणपत्र उच्च न्यायालयाने अवैध ठरविले आहे. सर्वोच्च न्यायालयातून स्टे मिळालेला आहे. त्यामुळे आपले खासदारपद वाचावे आणि या माध्यमातून भाजप नेत्यांची कृपादृष्टी मिळवून केंद्रात मंत्रिपद मिळवावे, यासाठी खा. राणा या नौटंकी करीत असल्याची टीका शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत केली.
खा. तुमाने म्हणाले, संकटात सापडल्यावरच खा. राणा यांना त्या दलित असल्याची आठवण आली. मुळात संसदेत त्यांनी दलितांचे प्रश्न कधी उपस्थित केले नाही. आता त्या आणि त्यांचे आमदार पती हे हनुमान चालिसाच्या नावावर जनतेची दिशाभूल करीत आहेत. राणा दाम्पत्यांनी अमरावतीत भूखंड व संस्था लाटल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
यावेळी शिवसेना नेते सुरेश साखरे यांनी खा. नवनीत राणा या संसदेत दलितांच्या प्रश्नांवर मौन राहत असल्याची टीका केली. भंडारा जिल्ह्यासह मुंबई, औरंगाबाद येथे दलितांवर हल्ले झाले. परंतु खा. राणा या संसदेत काहीच बोलल्या नाही. त्यांना स्वत:ला दलित म्हणवून घेण्याचा अधिकारच नसल्याचेही ते म्हणाले. यावेळी मंगेश काशीकर, दीपक कापसे, नितीन तिवारी उपस्थित होते.