नागपूर : वर्धेचे भाजप खासदार रामदास तडस यांचा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदी विराजमान होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दि. ३१ जुलै रोजी नागपुरात कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार होती. मात्र, लातूरचे काका पवार आणि सोलापूरचे धवलसिंह मोहिते-पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली आहे.
तडस यांच्या नियुक्तीची दि. २८ तारखेला औपचारिक घोषणा होणार आहे. तडस हे चार वेळा विदर्भ केसरी राहिले आहेत. नव्या कार्यकारिणीत अर्जुन पुरस्कारप्राप्त काका पवार महासचिव, मुंबईचे संजय शेट्ये कोषाध्यक्ष, तर वैभव लांडगे उपाध्यक्ष असतील. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखालील याआधीच्या कार्यकारिणीत तडस हे उपाध्यक्ष होते. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी निर्वाचन अधिकारी अतुल शिवणकर यांनी रिंगणात कायम असलेल्या उमेदवारांची अंतिम यादी वाचून दाखविली. गुरुवारी औपचारिक घोषणा होईल, तर दि. ३१ जुलै रोजी नागपुरात जवाहर वसतिगृहात होणाऱ्या आमसभेत नव्या कार्यकारिणीचे पदग्रहण होणार आहे.
बिनविरोध विराजमान झालेली राज्य कुस्तीगीर परिषदेची नवी कार्यकारिणी
अध्यक्ष रामदास तडस, वरिष्ठ उपाध्यक्ष विजय बोराटे, उपाध्यक्ष हनमंत गावडे, सुनील चौधरी, डाॅ. संजय तिरथकर, संजय चव्हाण, दीपक पवार, वैभव लांडगे, महासचिव काका पवार, कोषाध्यक्ष संजय शेट्ये, संयुक्त सचिव विलास कथुरे, मारुती आडकर, अनिल पांडे, वामन गाटे, गोरखनाथ बलकवडे, रवींद्र पाटील. कार्यकारी सदस्य (एकूण ८ त्यापैकी ३ पदे रिक्त) योगेश दोडके, ज्ञानेश जाधव, दिलीप इटनकर, सुनील देशमुख, संदीप भोंडवे.
हिंदकेसरी कुस्ती स्पर्धा नागपुरात घेणार : तडस
बिनविरोध अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर ‘लोकमत’शी बोलताना खासदार रामदास तडस यांनी यंदा हिंदकेसरी कुस्तीचे आयोजन नागपुरात करण्यास आपले प्रथम प्राधान्य असेल, असे सांगितले.