नागपूर : महाराष्ट्राच्या राजकारणाची भाषा बदलली आहे, अस मुळीच वाटत नाही. जे महाराष्ट्रद्रोही आहेत, मराठी द्वेष्टे आहेत, भ्रष्टाचारी आहेत आणि ज्यांच्या मनात द्वेष आहे अशा लोकांना जी भाषा कळते त्या भाषेतच बोलावं अस संत सांगून गेले आहे. अशा नरा मोजूनी माराव्या पैजा हजार.. मारावी हजार मोजावी एक.. काय त्यांची मिरवणूक काढावी.. जर एखादा महाराष्ट्रद्रोही राजकीय पक्षाचा बुरखा घालून आमच्यावर थुंकत असेल तर मला वाटतं मी फारच सौम्य भाषा वापरली आहे, अशी खोचक प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
खासदार संजय राऊत हे आज नागपूर दौऱ्यावर आहेत. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी आपली बाजू मांडली. नुकतचं राऊत यांनी मुंबईत पत्रकारपरिषद घेत भाजप नेते किरीट सोमैयांवर टीकेची झोड उडवली होती. यावर सोमैया यांच्यासह भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली होती. ही योग्य भाषा नसल्याचं म्हणत संजय राऊतांना आता चौकशी होणार कळल्यामुळे ते सैरभैर झालेत, असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते. त्यावर संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
महाराष्ट्रात एखादा पक्ष राज्याची सतत बदनामी करीत असेल किंवा थुंकत असेल तर त्याची आरती करावी, असं ज्यांना वाटत असेल त्यांनी खुशाल त्यांची आरती करावी. आम्ही अत्यंत सौम्य भाषा वापरली आहे. तसेच ज्यांना या भाषेविषयी शंका आहे. त्यांनी आपली मराठी डिक्शनरी पाहावी किंवा साधुसंतांची पुस्तक वाचावी, असे राऊत म्हणाले.
चंद्रकांत पाटील यांनी आमच्या पक्षप्रमुखांना विनंती करण्याची गरज नाही,. मी बाळासाहेब ठाकरेंच्या काळापासून या पक्षाच्या मुख्य प्रवाहात ठाकरे कुटुंबासोबत आहे. त्यांनी आम्हाला ज्ञान देण्याची गरज नाही, त्यांनी दिवसागणिक झिजत जाणारा स्वत:चा पक्ष सांभाळावा, असे राऊत यावेळी बोलताना म्हणाले.