नागपूर : शिवसेना खासदार संजय राऊत आज नागपूर दौऱ्यावर आहेत. त्यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली तसचं माध्यमांशी संवाद साधताना विदर्भ व शिवसेनेसंदर्भात महत्वाची घोषणा केली.
विदर्भात शिवसेनेचे लक्ष नसल्याचे बोलले जाते. असं नाही विदर्भात आता लक्ष द्यायला सुरुवात करणार आहोत. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासी चर्चा झाली असून लवकरच महत्वाचे बदल होणार असल्याचे राऊत म्हणाले. संघटनात्मकदृष्ट्या मुख्यमंत्री काही निर्णय घेणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
नागपूर नक्कीच बदललंय, दोन वर्षांनंतर आपण नागपूरला आलो असून आता हळूहळू नागपूरच्या फेऱ्या वाढतील, असही ते म्हणाले. विदर्भात शिवसेनेचा विस्तार करण्याबाबतचे संकेत त्यांनी दिले. निवडणुका वगैरे आहेतचं पण नागपूर आणि विदर्भाच्या संघटनात्मक बांधणीसाठी मला नागपुरात यावे लागणार असल्याचेही राऊत यावेळी म्हणाले.
आघाडी वगैरे शब्द बदला
या देशात तिसरी, चौथी, पाचवी आघाडी हे प्रयोग कधीच यशस्वी झाल्याचे दिसले नाही. निवडणुका सुरू झाल्या की आघाडीची चर्चा होते. रविवारी तेलंगाणा से मुख्यमंत्री केसीआर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. भविष्यात या दोन नेत्यांशिवाय इतर अनेक पक्षाचे नेते एकत्रित भेटणार अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिली. काँग्रेसशिवाय आघाडी स्थापन होईल असे आम्ही कधीच म्हटले नाही. ज्यावेळी ममता बॅनर्जींनी राजकीय आघाडी सुचवली होती, त्यावेळी शिवसेना हा पहिला राजकीय पक्ष होता ज्याने काँग्रेसला सोबत घेण्याची चर्चा केली होती. सर्वांना सोबत घेऊन नेतृत्व करण्याची क्षमता केसीआरमध्येही आहे, असे राऊत म्हणाले.