यदु जोशी
नागपूर : राष्ट्रवादीतील फुटीनंतर या पक्षाचे संस्थापक शरद पवार हे त्यांच्या वाढदिवशी १२ डिसेंबरला युवा संघर्ष यात्रेच्या समारोपासाठी नागपुरात असतील. त्यावेळी त्यांचे पुतणे, उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांना भेटणार का याबाबत उत्सुकता आहे. परंतु, या भेटीची शक्यता कमीच असल्याचे सूत्रांनी सांगितले.
अजित पवार यांनी केलेल्या बंडानंतरचा शरद पवारांचा हा पहिलाच वाढदिवस. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने अजित पवार आणि त्यांचे सहकारी सध्या नागपुरातच आहेत. ते किंवा त्यांचे सहकारी मंत्री, आमदार प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे वा माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल हे शरद पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी जातील की नाही याबाबत चर्चा आहे.
सभेनंतर दिल्लीला रवाना होणार
शरद पवार १२ डिसेंबरला दुपारी १ वाजता नागपुरात येतील. एका नामांकित हॉटेलवर दोन तास थांबतील व नंतर सभेसाठी रवाना होतील. सभेनंतर ते लगेच दिल्लीला रवाना होणार आहेत.
राष्ट्रवादीतील फुटीनंतर अजित पवार व त्यांच्यासोबतचे सगळेच शरद पवार यांना मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला भेटले होते. मध्यंतरी काका-पुतण्यांची भेट पुण्यातही झाली होती.
वाढदिवसाला मात्र अजित पवार
त्यांच्या भेटीला जातील की नाही, याबाबत अजून नक्की काहीच ठरलेले नाही असे अजित पवार गटाच्या एका नेत्याने सांगितले.
दैवतास शुभेच्छा पण...
आपल्या दैवताला शुभेच्छा देण्यासाठी लावलेल्या होर्डिंगवर ना त्या देवतेचा फोटो ना नाव. विचित्र वाटते ना! पण नागपुरात लावलेल्या काही होर्डिंगवर तसे बघायला मिळत आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा मंगळवारी वाढदिवस आहे. त्यांना शुभेच्छा देताना त्यांचा फोटो वा नाव मात्र होर्डिंगवर दिसत नाही.
माजी राज्यमंत्री सुभाष ठाकरे मित्र मंडळातर्फे नागपुरात लावण्यात आलेल्या होर्डिंगवर ही गंमत पाहायला मिळते. ‘आदरणीय देवतास निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा’ असे त्यावर स्पष्टपणे नमूद केले असले तरी देवता म्हणजे नक्की कोण हे स्पष्ट होत नाही.