नागपूर : महापालिकेच्या नियंत्रणाखाली असलेल्या भांडेवाडी शेल्टर हाऊसमध्ये जल व वायू प्रदूषण नियंत्रणात बाळगलेली अनास्था आणि जैव-वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात प्रचंड निष्काळजीपणा केल्याचा ठपका महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) ठेवला आहे. याबाबत एमपीसीबीने महापालिकेला शाेकाॅज नाेटीस बजावले असून २० दिवस लाेटूनही महापालिकेकडून कुठलेही उत्तर आलेले नाही.
भांडेवाडी शेल्टर हाऊस व नसबंदी केंद्रात प्रदूषण नियंत्रणाबाबत अनियमितता असल्याची तक्रार प्राणीप्रेमी अंकिता शाह यांनी एमपीसीबीला दिली हाेती. या तक्रारीवरून एमपीसीबीच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी २८ फेब्रुवारी २०२४ राेजी शेल्टर हाऊसला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली हाेती. या पाहणीत अनेक बाबतीत अव्यवस्था आढळून आली हाेती. विशेष म्हणजे श्वानांवर नसबंदी शस्त्रक्रिया करताना बंधनकारक असलेले जैव वैद्यकीय कचरा नियंत्रण प्राधिकरणाचे परवानगी प्रमाणपत्रच भांडेवाडीच्या केंद्रासाठी घेण्यात आले नव्हते. यासह श्वान निवारागृहातून निर्माण होणाऱ्या जैव-वैद्यकीय कचऱ्याचशास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी उपाय याेजना केल्या नाही आणि त्याबाबत तपशीलवार नाेंदीही ठेवल्या नसल्याचा ठपका एमपीसीबीच्या पथकाने ठेवला हाेता. या अव्यवस्थेवर कारवाई का केली जावू नये, असा इशारा देत २० मे २०२४ राेजी कारणे दाखवा नाेटीस महापालिकेला बजावण्यात आले हाेते. महापालिकेने अद्याप यावर भूमिका स्पष्ट केली नाही.
एमपीसीबी पथकाला आढळलेली अनियमितता
- प्राणी निवारा केंद्र व एबीसी सेंटर चालविताना संबंधित प्राधिकरणाकडून परवानगी घेणे, अटींचे पालन करणे आणि जवळच्या क्षेत्रामध्ये कोणत्याही प्रकारचे प्रदूषण टाळण्यासाठी सर्वसमावेशक प्रदूषण नियंत्रण प्रणाली चालवणे आणि देखरेख करणे अनिवार्य आहे.
- मात्र भांडेवाडी श्वान निवारा केंद्र चालविणे व सर्जिकल ऑपरेशन करण्यासाठी जैव-वैद्यकीय प्राधिकरणाची मान्यता घेतली नाही.- केंद्राने जैव-वैद्यकीय कचरा निर्मिती आणि विल्हेवाटीच्या तपशीलांची नोंद ठेवली नाही.
- जैव-वैद्यकीय कचरा नियम, २०१६ नुसार स्वतंत्र जैव-वैद्यकीय कचरा साठवण क्षेत्र प्रदान केलेले नाही.- जैव-वैद्यकीय कचरा नियम, २०१६ नुसार ‘बायो-मेडिकल वेस्ट कलर कोडेड’ पिशव्या पुरवल्या नाहीत.
- श्वान निवारागृहातून निर्माण होणाऱ्या जैव-वैद्यकीय कचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी सीबीएमडब्ल्यूटीएसडीएफचे सुविधा सदस्यत्व घेतलेले नाही.
भांडेवाडी प्राणी निवारा केंद्रातील अनियमिततेसाठी महापालिकेला गेल्या २० मे राेजी नाेटीस बजावले हाेते. त्यावर मनपाकडून अद्याप कुठलेही उत्तर आले नाही. याबाबत एमपीसीबीच्या मुख्यालयाला पत्र पाठविणार असून त्यांच्या निर्देशानुसार कारवाई करण्यात येईल - हेमा देशपांडे, क्षेत्रीय अधिकारी, एमपीसीबी, नागपूर